मुंबई मनपाने टीएमटीच्या बसथांब्यांसह कंट्रोल रूमही तोडली, प्रवासी उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:24 AM2020-02-27T00:24:57+5:302020-02-27T00:25:51+5:30
ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिकेत नवा वाद रंगण्याची चिन्हे
ठाणे : मुलुंड रेल्वेस्थानकाच्या बाहेर असलेल्या टीएमटीच्या दोन बसथांब्यांवर आणि एका कंट्रोल रूमवर मुंबई महापालिकेने कारवाई केल्यानंतर ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिकेत चांगलाच नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता मुंबई महापालिकेने टीएमटीच्या या बसथांब्यांवर कारवाई केली असून याच परिसरात असलेल्या दुकानांवर मात्र ती केलेली नसल्याचा आरोप परिवहन प्रशासनाने केला आहे. या मार्गावर टीएमटीचे जवळपास ५० हजार प्रवासी दैनंदिन प्रवास करत असून बसथांब्यांवरच कारवाई केल्याने या प्रवाशांची उन्हामुळे आता गैरसोय होऊ लागली आहे.
दुसरीकडे ज्या जागेवर हे बसथांबे बांधले होते, त्या ठिकाणी जलवाहिनी टाकण्याच्या कामांसाठी ही कारवाई केली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बसथांबे बांधून देण्याची मुंबई महापालिकेने तयारी दर्शवली असली, तरी मुंबई महापालिकेने योग्य पद्धतीने समन्वय करून ही कारवाई करणे अपेक्षित होते, असे टीएमटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबईत ५० टीएमटीच्या ४७२ फेऱ्या
मुलुंड पश्चिमेला राज्य परिवहन महामंडळाची रीतसर परवानगी घेऊन हे बसथांबे उभारले आहेत. ठाणे ते मुलुंडच्या या मार्गावर ५० पेक्षा अधिक बस धावतात. तर, ४७२ दैनंदिन फेºया होत असून ११ मार्गांवर टीएमटी प्रवासी सेवा देते. तर, जवळपास ५० हजारांपेक्षा जास्त प्रवासी या मार्गावरून प्रवास करत असून या बसथांब्यांवर आता कारवाई केल्याने या सर्व प्रवाशांची आणि या बसथांब्यांवरील टीएमटीच्या कर्मचाऱ्यांचीदेखील गैरसोय झाली आहे. बसथांब्यांच्या शेडची सुविधा नसल्याने प्रवाशांना फुटपाथच्या खाली उन्हात उभे राहावे लागत आहे.
ठाण्यातील बेस्टचे थांबे अनधिकृत?
ज्याप्रमाणे टीएमटीची सेवा मुंबई महापालिकेच्या हद्दीत सुरू आहे, त्याचप्रमाणे बेस्टच्यादेखील २०० पेक्षा अधिक दररोज फेºया ठाण्यात होत आहेत. यामध्ये बेस्टला टीएमटीच्या बसथांब्यांचा वापर करावा लागतो. त्यासाठी टीएमटीकडून कोणत्याही प्रकारची हरकत घेतली जात नाही. मात्र, ज्या ठिकाणी बेस्टने बसथांबे उभारले आहेत, ते ठाणे महापालिकेची रीतसर परवानगी घेऊन उभारले आहेत का, असा प्रश्न आता यानिमित्ताने टीएमटी प्रशासनाने केला आहे.
बाजूच्या गाळ्यांना मात्र अभय
मुलुंड पश्चिमेला असलेल्या टी विभागातील जटाशंकर डोसा रोडच्या पूर्वेला ज्या ठिकाणी फुटपाथवर टीएमटीचे बसथांबे आहेत, त्या ठिकाणी पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्यासाठी जलवाहिनी उपलब्ध नसल्याने हे सर्व पाणी मुलुंड रेल्वेस्थानकामध्ये घुसते. त्यामुळे जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्याचे कारण देऊन मुंबई महापालिकेने ही कारवाई केली असल्याचे पत्र टीएमटी प्रशासनाला दिले आहे. मात्र, ही कारवाई करण्यापूर्वी टीएमटी प्रशासनाला लेखी स्वरूपात पत्र देणे अपेक्षित असताना मुंबई महापालिकेने टीएमटी प्रशासनाला ते पाठवले नसल्याचे टीएमटीने स्पष्ट केले आहे. एकीकडे टीएमटीच्या बसथांब्यांवर कारवाई केली जाते. मात्र, बाजूलाच असलेल्या गाळ्यांसंदर्भात मात्र डोळेझाक केली जात असल्याचा आरोप आता टीएमटी प्रशासन आणि प्रवाशांकडून होऊ लागला आहे.