मुंबई-नाशिक महामार्गाची ‘वाट’ बिकट, कसारा, माळशेज घाट जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 01:53 AM2021-02-01T01:53:12+5:302021-02-01T01:56:03+5:30

Mumbai-Nashik highway News : राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण क्रमांक ३ देशातील महत्त्वाचा महामार्ग समजला जातो. परंतु व्यवस्थापन व ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीमुळे या राष्ट्रीय महामार्गाची एक ते दीड वर्षापासून पूर्णतः चाळण झाली आहे.

Mumbai-Nashik highway condition is bad | मुंबई-नाशिक महामार्गाची ‘वाट’ बिकट, कसारा, माळशेज घाट जीवघेणा

मुंबई-नाशिक महामार्गाची ‘वाट’ बिकट, कसारा, माळशेज घाट जीवघेणा

googlenewsNext

- श्याम धुमाळ
कसारा : राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण क्रमांक ३ देशातील महत्त्वाचा महामार्ग समजला जातो. परंतु व्यवस्थापन व ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीमुळे या राष्ट्रीय महामार्गाची एक ते दीड वर्षापासून पूर्णतः चाळण झाली आहे.

सरकारच्या वतीने अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह राबविण्यात येतो. या सप्ताहादरम्यान चालकांना नियम समजावले जातात. परंतु रस्तेच असुरक्षित असतील तर रस्ता सुरक्षा सप्ताहात कितीही प्रबोधन केले तरी त्याचा काय फायदा? गोंदे ते पडघादरम्यान या महामार्गावरील दोन्ही मार्गिका अपघातासाठी पर्वणी ठरत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर गोंदे (नाशिक) ते पडघा (ठाणे) या दरम्यान रस्त्याची चाळण झाली आहे. काही ठिकाणी रस्ते खडबडीत झाले असून, त्यामुळे दुचाकींचे अपघातात वाढले. या वर्षभरात २५२ हून दुचाकींचे तर १५३ छोट्या-मोठ्या वाहनांचे अपघात झाले. महामार्गावरील कसारा घाटाची तर अवस्था वाईट आहे. आठ किलोमीटरच्या जुन्या घाट क्षेत्रात रस्त्याला दरीच्या बाजूने दरवर्षी लाखो रुपये खर्च करून संरक्षक कठडे बांधण्यात येतात. परंतु संरक्षक भिंतीला लोखंडी सळ्या न वापरल्याने आणि त्या पूर्णतः निकृष्ट असल्यामुळे थोड्या धक्क्याने ढासळतात. निकृष्ट कठड्यामुळे गेल्या वर्षभरात ८ ट्रक, कार ही वाहने कठडे तोडून खोल दरीत गेली आहेत. 

महामार्गाचा दर्जा सुधारणे गरजेचे  
या महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्यात पडलेले पॅच दुचाकी, छोट्या कारचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील गोंदे ते पडघा यादरम्यान रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे आहे, तर सर्वाधिक अपघात क्षेत्र असलेल्या कसारा घाटात संरक्षक कठडे, रबरिंग स्पीड ब्रेकर, ब्रेकफेल पॉइंट, वाहनतळ होणे गरजेचे आहे. साइडपट्ट्या निरुपयोगी असल्यामुळे त्याचा वापर वाहनचालकांना होत नाही. 

महामार्गावरील अनेक त्रुटींबाबत कसारा व महामार्ग पोलिसांनी अनेकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीशी पत्रव्यवहार केल्याचे समजते. परंतु त्या पत्रांना केराची टोपली दाखवण्यात आली. परिणामी या सर्व त्रुटींमुळे पोलीस प्रशासन, अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे येणाऱ्यांची दमछाक होते. वाहनांवरील वेग, सीटबेल्ट, हेल्मेट, ड्रिंक ॲन्ड ड्राइव्हच्याबाबत पोलीस जनजागृती व कारवाईही करतात. परंतु महामार्गाचा दर्जा सुधारणे गरजेचे आहे. 

अपघाताची ठिकाणे
 मुंबई नाशिक महामार्गावरील वासिंद फाटा (चक्रधारी हॉटेल)
 आसनगाव परिवार गार्डनसमोरील फाटा
 आटगाव रेल्वेस्थानकासमोरील वळण
 खर्डी रेल्वे ट्रॅकवरील पूल ते ओव्हर ब्रिज
 उंबरमाळी ते मोखावणे फाटावरील नागमोडी वळण
 कसारा-वाशाला फाटा (चौफुली)
 ओहळाची वाडी ते फाॅरेस्ट नर्सरी नागमोडी वळण
 जव्हार फाटा ते टोपाची बावडीदरम्यानचे नागमोडी वळण.
 पिंपरी फाटा, सिन्नर फाटा. 

महामार्गावरील अनेक त्रुटींबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी पत्रव्यवहार केला असून घाट क्षेत्रात अपघातांची संख्या लक्षात घेता विविध उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला केल्या आहेत.
- दत्तू भोये, पोलीस निरीक्षक, 
कसारा पोलीस ठाणे. 

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहनचालकांना विविध सूचना देण्याचे काम व त्यांची आरोग्य तपासणी आम्ही करतो. सीटबेल्ट, हेल्मेटचे महत्त्व आम्ही वाहनचालकांना कायम सांगत असतोच. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरूच आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांच्या त्रुटींबाबत महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीला नियमीत पत्रे दिली जातात.
- अमोल वालझाडे, 
प्रभारी अधिकारी, महामार्ग पोलीस


मुंबई-नाशिक एक्स्प्रेसवेच्या रस्त्यांची सध्या दुरुस्ती सुरू असून दोन महिन्यात रस्त्यावरील सर्व त्रुटी निकाली काढण्याचा आमचा प्रयत्न असून त्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल.
- राकेश ठाकूर, 
प्रोजेक्ट मॅनेजर, पिक इन्फ्रा 

कुठे सूचना फलक नाही, तर कुठे आहेत कचऱ्याचे ढीग; महामार्गावर झाली त्रुटींची गर्दी 

महामार्गावर ब्लिंकर लाइट, दिशादर्शक बोर्ड, रबरिंग स्पीड ब्रेकर, धोक्याच्या वळणावर सूचना फलक, पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडीसाठी रोलिंग प्रेस जाळ्या बसवणे यासह वाशिंद, चेरपोली (शहापूर), ललित कंपनी, कसारा बायपास, घोटीजवळ रस्त्याच्या दुतर्फा असलेले कचऱ्यांचे ढीग अपघातास कारणीभूत ठरत आहेत. 
नवीन कसारा घाटातून मुंबईकडे येताना घाट मार्गात अनेक नागमोडी वळण आहेत. तीव्र उतार व नागमोडी वळणामुळे भरधाव वेगात असणाऱ्या वाहनांना नियंत्रित करण्यास अडचणी निर्माण होतात व परिणामी अपघात होतात. अशा अनेक त्रुटी या महामार्गावर आहेत. त्या त्रुटी सुधारल्या तर अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. 

 

Web Title: Mumbai-Nashik highway condition is bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.