रस्त्यावरील खड्डयांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर पुन्हा अडथळ्यांची शर्यत; पोलिसांसह यंत्रणांची तारांबळ

By जितेंद्र कालेकर | Published: September 13, 2022 09:58 PM2022-09-13T21:58:47+5:302022-09-13T21:59:44+5:30

सकाळी ८ ते दुपारी १२ अशी चार तास अडथळयांच्या शर्यतीचा हा सामना चालकांना करावा लागला.

mumbai nashik highway faces another hurdle race due to potholes consistency of systems including police | रस्त्यावरील खड्डयांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर पुन्हा अडथळ्यांची शर्यत; पोलिसांसह यंत्रणांची तारांबळ

रस्त्यावरील खड्डयांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर पुन्हा अडथळ्यांची शर्यत; पोलिसांसह यंत्रणांची तारांबळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे शहरातील कोपरी ब्रिजसह साकेत ब्रिजवरील खड्डयांमुळे मुंबई नाशिक मार्गावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र मंगळवारी ठाणेकरांना अनुभवायला मिळाले. मुख्य मार्गावर पडलेल्या खडय़ांमुळे शहराच्या विविध भागात तसेच इतर ठिकाणी देखील वाहतुक कोंडीचा ताप वाहन चालकांना सहन करावा लागल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. सकाळी ८ ते दुपारी १२ अशी चार तास अडथळयांच्या शर्यतीचा हा सामना चालकांना करावा लागला.

ठाणेकरांना आता खडय़ांमुळे नित्याचीच वाहुतक कोंडी झालेली आहे. त्यात साकेत मार्गावर पुन्हा खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. त्यात भर म्हणून मुंबई नाशिक मार्गावर दोन ठिकाणी ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या रांगा थेट तीन हात नाक्यापर्यंत लागल्या होत्या. त्यातही या मार्गावर पडलेल्या खडय़ांचा ताप नाहक वाहन चालकांना सहन करावा लागत होता. पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांच्यासह वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी संबंधित यंत्रणांची तातडीने मदत घेतली. त्यामुळे माजिवडा आणि कोपरी भागात हे काम युद्धपातळीवर राबविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर वारंवार खड्डे पडल्याचे चित्र आहे. आधी काही प्रमाणात बुजविले खड्डयांमुळे रस्ता रुळावर येत असतांनाच सोमवारी झालेल्या पावसांमुळे पुन्हा या खड्डयांमध्ये भर पडली. अनेक खड्डयांमध्ये पाणी भरल्यामुळे वाहतूकीचा वेगही मंदावला होता. ठाणे वाहतुक पोलिसांच्या वतीने एमएसआरडीसी, बांधकाम विभाग तसेच इतर प्राधिकरणांना पत्रव्यवहार केला आहे. परंतू, वारंवार होणाऱ्या खड्डयांंमुळे नागरिकांसह पोलिसांनाही याचा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

शहरातील मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते कॅडबरी जंक्शन, कशेळी-काल्हेर, कोपरी पूल आणि शिळफाटा भागात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूकीचा वेग मंदावून वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी १ नंतर ही वाहतूक काही प्रमाणात पूर्वपदावर आली. या वाहतूक कोंडीमुळे अवघे पाच मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना २५ ते ३० मिनिटांचा अवधी लागत होता.अनेकांना कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहचता आले नाही.

कुठे पडली खड्डयांची भर

सोमवारी रात्रभर झालेला पाऊस. त्यात साकेत ब्रिजवर आणि कोपरी पूलावर तसेच खारेगाव ते साकेत या मार्गावर मोठया प्रमाणात खड्डे वाढले होते. त्यात अवजड वाहनांची वाहतूक ही पहाटे ५ ऐवजी उशिरापर्यंत सुरु राहिल्यामुळे या कोंडीमध्ये आणखीनच भर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: mumbai nashik highway faces another hurdle race due to potholes consistency of systems including police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे