खंडणी गोळा करणाऱ्या मुंबईतील ‘त्या’ पोलिसावर होणार अटकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:38 PM2020-07-07T23:38:31+5:302020-07-07T23:42:04+5:30
एका तोतया पोलिसासोबत वाहन चालकांकडून खंडणी उकळणा-या मुंबई पोलीस दलातील साकीनाका वाहतूक शाखेतील एक पोलीस शिपाई प्रसाद महाडीक याच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तो कोरोना संशयित असल्यामुळे त्याला कॉरंटाईन करण्यात आले होते. त्याला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळे कॉरंटाईन केलेल्या मुंबईच्या साकीनाका वाहतूक शाखेतील पोलिसाने चक्क ठाण्याच्या खारेगाव टोलनाका येथील वाहन चालकांकडून खंडणी उकळल्याचे रविवारी समोर आले. याप्रकरणाची माहिती मुंबईच्या पोलीस आयुक्तांना देण्यात आली असून त्याला लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती कळवा पोलिसांनी मंगळवारी दिली.
ठाण्याच्या खारेगाव टोलनाका येथे पाचपाखाडीतील एका रहिवाशाकडून पाच हजारांची रोकड आणि मद्याच्या बॉटल घेतल्याप्रकरणी अमोल देवळेकर या तोतया पोलिसाला कळवा पोलिसांनी सापळा रचून अत्यंत नाटयमयरित्या ५ जुलै रोजी अटक केली. त्याच्याकडून एका कारसह बनावट ओळखपत्र, पोलीस अधिकाºयाची टोपी, पाच हजारांची रोकड आणि मद्याच्या बाटल्यांचा एक बॉक्स असा मुद्देमालही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर आणि उपनिरीक्षक महेश कवळे आदींच्या पथकाने हस्तगत केला. त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली असून मुंबई पोलीस दलातील साकीनाका वाहतूक शाखेतील एक पोलीस शिपाई प्रसाद महाडीक याच्यावरही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाडीक याला कॉरंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे कळवा पोलिसांनी त्याला तूर्त नोटीस बजावली आहे. त्याचा कॉरंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची चौकशी करुन त्याला अटकही केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी दिली. महाडीक हा भांडूप येथील रहिवाशी असून त्याने आणखी असे किती प्रकार केले? याबाबतही चौकशी करण्यात येत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.