Mumbai Rains : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; ठाणे- कल्याण मार्गावर विशेष लोकल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 09:25 AM2020-09-23T09:25:00+5:302020-09-23T09:55:18+5:30
सुरक्षिततेच्या कारणामुळे प्रवासात कुठे अडकण्यापेक्षा ठाणे जिल्ह्यातील चाकरमान्यांनी घरीच राहणे पसंत केले.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली : अत्यावश्यक सेवेसाठी आणि काही प्रमाणात बँक कर्मचाऱ्यांसाठी शासनाने रेल्वे सेवा सुरू केली आहे. परंतु मुंबई उपनगरात मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे जीवनवाहिनी ठाणेमुंबई मार्गावर बंद करण्यात आली. सुरक्षिततेच्या कारणामुळे प्रवासात कुठे अडकण्यापेक्षा ठाणे जिल्ह्यातील चाकरमान्यांनी घरीच राहणे पसंत केले.
मध्य रेल्वेने सकाळी लवकरच त्यासंदर्भात ट्विट करून प्रवाशांना माहिती देत सतर्क केले होते. मुंबईतील सायन, मस्जिद आणि अन्य सखल पाणी साचल्याने ठाणे- मुंबई सेवा बंद करण्यात आली. तसेच, ठाणे-कल्याण मार्गावर अनिश्चित कालावधीत विशेष लोकल चालवण्यात आल्या. मात्र, त्याला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता.
ठाणे जिल्ह्यातही पहाटे 5 नंतर पावसाची संततधार होती, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. डोंबिवलीमध्ये देखील चाकरमानी रेल्वे स्थानकात आले, आणि लोकल सेवा नाही म्हंटल्यावर त्यांनी परतीचा मार्गाने घरी जाणे पसंत केले.
शहरातील पूर्वेला इंदिरा गांधी चौकातून खासगी कामगारांसाठी एसटी, आणि अन्य बस सेवा सुरू असतात त्यालाही अल्प प्रतिसाद मिळाल्याने प्रवाशांपेक्षा बसची संख्या अधिक क्षमतेने असल्याचे दिसून आले. रिक्षा व्यवसायाला देखील पावसामुळे प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रवासी नाहीत तर पावसात ताटकळत राहण्यापेक्षा आरोग्याच्या कारणास्तव अनेकांनी घरी राहणे पसंत केले.
- मध्य रेल्वेने मनमाड येथून येणारी एक्स्प्रेस आणि मुबंई येथुन जाणारी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती, तसेच एलटीटी गुवाहाटी आणि मुंबई लखनऊ, मुंबई बेंगळुरू या विशेष गाड्यांचे वेळापत्रक रिशेड्युल करण्यात आल्याची माहिती ट्विटद्वारे जाहीर करण्यात आली.