संचालकांच्या अपहरणात मुंबईच्या हवालदाराचा समावेश; २५ लाख जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 05:30 AM2018-09-11T05:30:30+5:302018-09-11T05:31:29+5:30
उदयपूर (राजस्थान) येथील खासगी वित्त संस्थेकडे मोठे कर्ज मागण्याच्या बहाण्याने दोन संचालकांचे अपहरण करून २५ लाखांची खंडणी उकळण्याचा डाव ठाणे खंडणीविरोधी पथकाने उधळून लावला.
ठाणे : उदयपूर (राजस्थान) येथील खासगी वित्त संस्थेकडे मोठे कर्ज मागण्याच्या बहाण्याने दोन संचालकांचे अपहरण करून २५ लाखांची खंडणी उकळण्याचा डाव ठाणे खंडणीविरोधी पथकाने उधळून लावला. लेनीन कुट्टीवट्टेसह सहा जणांना अटक करून २५ लाखांची रोकड, तलवार हस्तगत केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली. आरोपींत तुकाराम मुदगन हा मुंबईचा पोलीस हवालदारही आहे.
उदयपूरच्या ‘श्री तिरुपती फायनानिक्स निधी लिमिटेड’ या कंपनीकडे लेनीन आणि त्याच्या साथीदारांनी मालमत्तेच्या तारणावर मोठे कर्ज मागितले. मालमत्ता व मूळ कागदपत्रे दाखवण्याच्या बहाण्याने देवानंद वरंदानी आणि रोनक सैनी (रा. दोघेही उदयपूर, राजस्थान) या दोन्ही संचालकांना ठाण्यात बोलावले. त्यांचे ७ सप्टेंबरला अपहरण केले. तलवारीच्या धाकावर, मारहाण करून एक कोटीची खंडणी मागितली. ठार करण्याची धमकी दिली. देवानंद यांनी अखेर २५ लाख देण्याचे मान्य केले. उदयपूर येथून त्यांचा साथीदार पैसे घेऊन आला. देवानंद यांच्या मित्राने ही माहिती ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना दिली. पोलिसांनी सापळा लावून अपहरणकर्त्यांची गाडी कल्याणमधून ८ सप्टेंबरला पकडली. गाडीतून एका अपहृत संचालकाची सुटका केली. तर, लेनीन आणि शेलार यांना २५ लाखांच्या रोकड आणि कारसह अटक केली.
>१५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
लेनीन, शेलारच्या चौकशीतून अन्य एका संचालकाची हाजीमलंग रोड येथील घरातून सुटका केली. तेथून सागर साळवे, ओमप्रकाश जैस्वाल, अभिषेक झा, पोलीस हवालदार तुकाराम मुदगन यांना अटक केली. साळवेसह चौघांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.