मुसळधार पावसात मुंबई, ठाणे पोलिसांनी चिमुकलीसाठी ग्रीन कॉरिडॉर केला; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 10:36 PM2019-07-26T22:36:50+5:302019-07-26T22:40:57+5:30
चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांची धडपड
मुंबई: मुसळधार पाऊस सुरू असताना आणि त्यामुळे झालेली वाहतूककोंडी अशा आव्हानात्मक परिस्थितीत पोलिसांनी एका चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर केला. मुंबई आणि ठाणे पोलिसांनी ताळमेळ साधून ग्रीन कॉरिडॉर यशस्वी करण्याची संपूर्ण तयारी केली. मात्र चिमुकलीचा जीव वाचू शकला नाही.
जिविता नाडर या अवघ्या साडेतीन वर्षांच्या बालिकेला डोंबिवलीच्या एस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. जिविताचं फुफ्फुस निकामी झाल्याचं निदर्शनास आलं. तिला महालक्ष्मी येथील बालरुग्णालयात तात्काळ हलविणं आवश्यक होतं. मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू होता. सर्वत्र वाहतूक कोंडी असल्यानं तिला रुग्णालयात कसं न्यायचं असा प्रश्न पडला होता. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि मुंबईच्या वाहतूक विभागाचे सहआयुक्त मधुकर पांडे यांनी ग्रीन कॉरिडारची तयारी दाखवली.
मुसळधार पाऊस कोसळत असतानाही ठाण्यात उपायुक्त अमित काळे यांनी ग्रीन कॉरिडॉर निर्माण केला. पोलीस हवालदार पारधी मुसळधार पावसात समन्वय साधत होते. तर मुंबईत सहायक आयुक्त विनायक वत्स यांनी आपले पथक तयार ठेवलं होतं. मुंबई आणि ठाण्याच्या वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षांनी ग्रीन कॉरिडॉरची संपूर्ण तयारी केली होती. सुसज्ज अॅम्बुलन्समधून जिविताला नेण्यात येणार होतं. पण त्याआधीच तिची प्रकृती ढासळली आणि तिनं प्राण सोडला.