अतिवृष्टीत बाधित झालेल्या मुंबई-ठाणेकरांना मिळणार नुकसानभरपाई, पालकमंत्री शिंदे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 05:09 PM2017-09-07T17:09:52+5:302017-09-07T17:10:57+5:30
२९ ऑगस्ट रोजी पावसाने उडवलेल्या हाहाकारात मुंबई आणि ठाण्यातील हजारो नागरिकांना फटका बसला. ठाण्यातील किमान ६ जण अतिवृष्टीत वाहून गेले असून त्यांच्या कुटुंबीयांची कधीही न भरून येणारी हानी झाली
ठाणे, दि. 7 - २९ ऑगस्ट रोजी पावसाने उडवलेल्या हाहाकारात मुंबई आणि ठाण्यातील हजारो नागरिकांना फटका बसला. ठाण्यातील किमान ६ जण अतिवृष्टीत वाहून गेले असून त्यांच्या कुटुंबीयांची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. तसेच घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असल्याची बाब पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेस आणून देत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या मुंबई तसेच ठाणेकरांना नुकसानभरपाई देण्याची आग्रही मागणी गुरुवारी केली.
मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे यांनी गुरुवारी या अतिवृष्टीग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. शिंदे यांची मागणी तात्काळ मान्य करत अतिवृष्टीत बाधित झालेल्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
अतिवृष्टीत झालेले नुकसान हे न भरून येणारे असले तरी या मदतीमुळे मुंबई आणि ठाणेकरांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असून, तातडीने मदत जाहीर केल्याबद्दल पालकमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. मी स्वत: २९ आणि ३० ऑगस्ट रोजी संपूर्ण परिसरामध्ये फिरून अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून यथाशक्ती मदतही केली आहे. परंतु झालेले नुकसान इतके मोठे आहे की, कितीही मदत केली तरी कमी पडेल, असे पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी संगितले.