मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. दिलीप पाटील यांना पुरस्कार
By Admin | Published: July 13, 2016 01:53 AM2016-07-13T01:53:32+5:302016-07-13T01:53:32+5:30
शाहूवाडी-पन्हाळा सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘शाहूवाडी-पन्हाळा रत्न २०१६’ पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. दिलीप पाटील यांना कोल्हापूरच्या दसरा
ठाणे : शाहूवाडी-पन्हाळा सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘शाहूवाडी-पन्हाळा रत्न २०१६’ पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. दिलीप पाटील यांना कोल्हापूरच्या दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे रविवारी दि. १० जुलै रोजी प्रमुख पाहुणे माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कोल्हापूरी मानाचा फेटा, ट्रॉफी, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. पाटील यांचे एम.ए., एमबीए व पीएचडीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. ते १४ वर्षे प्राध्यापक तर तीन वर्षे प्राचार्य होते. गेली १० वर्षे ते मुंबई विद्यापीठाचे संचालक आहेत. त्यांनी २० विद्यार्थ्यांना एमफील तर ७ विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले. त्यांनी इंग्लड, अमेरिका, द. अफ्रिका, न्युझिलंड, आॅस्ट्रेलिया, थायलंड आदी जगातील विविध विद्यापीठात ‘ग्रामीण विकास’ या विषयावर १२ शोधनिबंध सादर केले आहेत.
त्यांच्या विद्वतेची दखल घेऊन इंटरनॅशनल रोटरी फाऊंडेशन अमेरिका यांच्या वतीने त्यांची जगातील उत्कृष्ट १० प्राध्यापकात निवड केली आहे. त्यांनी सहकार, ग्रामीण विकास व विस्तार शिक्षण या विषयांची सहा पुस्तके लिहिली आहेत. ते विद्यापीठ अनुदान आयोग नॅक समितीचे सदस्य, नेट-सेट परीक्षा निरीक्षक व गरवारे व्यवस्थापन संस्थेवर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे मूळ गाव सोनवडे, ता. शाहूवाडी येथे आदर्श संसद ग्राम योजनेचे मुख्य प्रवर्तक आहेत. (प्रतिनिधी)