मुंबईच्या पाण्याची ठाण्यात होतेय नासाडी
By अजित मांडके | Published: March 23, 2023 01:11 PM2023-03-23T13:11:47+5:302023-03-23T13:12:46+5:30
जल बोगद्याच्या दुरुस्तीला मुहुर्त कधी मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :ठाणे जिल्ह्यातून मुंबईलापाणीपुरवठा करणारे पाणी जल बोगद्याद्वारे भांडुप येथील जल शुद्धीकरण प्रकल्पात नेले जाते. मात्र याच जलशुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेण्यात येणाºया भूमिगत जल बोगद्याला ठाणे शहरातील किसन नगर भागात बोअरवेल साठीचे खोदकाम करताना नोव्हेंबर महिन्यात हानी झाल्याची माहिती पुढे आली आहे. मागील पाच महिन्यांपासून या ठिकाणी दररोज अंदाजे तीन ते चार दशलक्ष लिटर पाणी वाया जात आहे. वाया जाणारे पाणी निदर्शनास येणार नाही अशा पद्धतीने गटारात व नाल्यात सोडलेले दिसत आहे. परंतु अद्यापही याठिकाणी दुरुस्ती का झाली नाही? असा सवाल कॉंग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी उपजलअभियंता यांना पत्रव्यवहार केला आहे.
दुरुस्तीसाठी २० जाने २०२३ पासून हा जलबोगदा बंद करावा लागणार आणि पुढील सूचना मिळेपर्यंत प्रक्रिये शिवाय पाणी पुरवठा होणार त्यामुळे नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कृपया पाणी उकळून प्यावे असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात होते. मात्र अद्यापही याचे काम काही सुरु झालेले नाही. काही वर्षांपूर्वी वागळे इस्टेट,किसन नगर भागात पाईपलाईन फुटून महापूर आला होता वागळे इस्टेटचा बहुतांश भाग त्यावेळी जलमय झाला होता व याचा फटका अंदाजे दहा ते पंधरा हजार रहिवाशांना बसला होता. जर या ठिकाणी जल बोगद्याला जास्त प्रमाणात हानी पोहोचली असती तर मागील वेळेपेक्षा मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होऊन जीवितहानी आणि वित्तहानी झाली असती. अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
मुख्य भूमिगत जल बोगदा जर कोणत्याही प्रकारे काम करताना फुटला गेला तर संबंधित कंपनी अथवा प्राधिकरणाला दुरुस्तीचा खर्च, पयार्यी व्यवस्थेचा खर्च,वाहून गेलेल्या पाण्याच्या किंमतीचा खर्च या दोघांची एकूण रक्कम अधिक ४०० टक्के दंड आकारला जाणार हा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला असल्याचे समजते. परंतु या ठिकाणी कुठलीही परवानगी नसताना बोअरिंग साठी खोदकाम करत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भूमिगत जल बोगद्याला हानी पोहोचविल्याबद्दल संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल का केला जात नाही, असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे दोषींवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाने अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यासाठी कडक नियम करणे गरजेचे असल्याची मागणी देखील त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"