धुम्रपानात मुंबईकर देशात दुसऱ्या क्रमांकावर
By admin | Published: May 31, 2017 06:00 AM2017-05-31T06:00:48+5:302017-05-31T06:00:48+5:30
तंबाखू सेवनामुळे विकासाला खीळ बसते. धुम्रपानात आपल्या देशात कोलकाता आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांक
मुरलीधर भवार / लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : तंबाखू सेवनामुळे विकासाला खीळ बसते. धुम्रपानात आपल्या देशात कोलकाता आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांक मुंबईचा लागतो, अशी माहिती कॅन्सर सर्जन डॉ. अनिल हेरुर यांनी दिली.
जागतिक तंबाखू विरोधी दिन ३१ मे रोजी पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाची थीम ‘थ्रेट टू डेव्हलपमेंट’ अशी ठेवली आहे. त्यापार्श्वभूमीवर डॉ. हेरुर यांनी सांगितले की, तंबाखू हा कालसर्प आहे. तो सगळ््याच वयोगटांतील महिला व पुरुषांना गिळंकृत करत आहेत. जगभरात तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्येच प्रमाण हे सात कोटी इतके आहे. त्यापैकी एक कोटी लोक भारतात तंबाखू सेवनामुळे मरण पावतात. तंबाखू सेवनामुळे केवळ तंबाखू खाणाऱ्याचाच मृत्यू होत नाही, तर सेकंड हॅण्ड स्मोकिंगमुळे त्याच्या धुराचा त्रास सिगारेट न पिणारा व तंबाखू न खाणाऱ्यास होतो. प्रत्यक्ष सेवन न करताही दुसऱ्याला त्याची झळ पोहचते. दररोज पाच हजार तरुण तंबाखूचे सेवनाला बळी पडतात. जगभरात धुम्रपान करणाऱ्यांची संख्या एक अब्ज आहे. त्यापैकी १० टक्के लोक हे भारतीय आहेत. तंबाखू सेवनामुळे केवळ तोंडाचा कर्करोगच होत नाही. तर हृदयाचे, फुफूसाचे आजार, अन्न नलिका, किडनी, मुत्राशयाचा कर्करोग तसेच रक्त वाहिन्याही बाधित होऊ शकतात. तंबाखू सेवनामुळे दाताचे आजार, पचनाची समस्या उद्भवू शकते. भारतात पुरुषांच्या बरोबरीने महिलाही तंबाखू खातात. या व्यसनाचे प्रमाण त्यांच्यातही झपाट्याने वाढताना दिसत आहे. तंबाखू व तंबाखूयुक्त सिगारेट, गुटख्याने तरुण पिढी तसेच सगळ््याच वयोगटांतील व्यक्तींना विळखा घातला आहे. तंबाखू हा विघातक पदार्थ आहे. तंबाखूचे पीक नगदी असल्याने ते जास्त प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे शेतजमिनीचे नुकसान होते. तसेच देशाची तरुण पिढी मरणपंथाच्या वाटेला लागते. सरकारला तंबाखू विक्रीतून चांगले उत्पन्न मिळत असले तरी आरोग्याची भली मोठी किंमत देश व समाजाला मोजावी लागते. तंबाखू केवळ मानवी आरोग्याला पोखरत नसून देशाच्या अर्थ व्यवस्थेला पोखरत आहे.
गुटखा सेवनाला शाळकरी मुले बळी पडत आहेत. अत्यंत लहान वयात त्यांना त्याचे व्यसन लागले आहे. एखादी व्यक्ती त्याच्या कुटुंबाचा आधार असते. तरुण व्यक्ती देशाचे भवितव्य आहे. त्याचबरोबर उत्पादन प्रक्रियेत उत्पादन घटक असलेली व्यक्ती तंबाखू सेवनामुळे आजाराला बळी पडते. त्यातून तिचा मृत्यू होतो. उत्पादक घटक नष्ट झाल्याने त्याला अप्रत्यक्षरित्या फटका देशाच्या उत्पादकतेला बसतो, याकडे हेरुर यांनी लक्ष वेधले आहे.
सरकारने गुटख्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरूच आहे. तंबाखूचे सेवन व धुम्रपान आरोग्यास हानिकारक आहे, असा संदेश अनेक चित्रपटांच्या जाहिरातीतून दिला जातो. तसेच सिगारेट व तंबाखूच्या पाकिटावरही हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. ही बाब चांगली असली तरी त्याचा किती परिणाम साधला जातो.
तंबाकूजन्य पदार्थ विकले जाऊ नये, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे पुरेशी यंत्रणा नाही. बंदीच्या निर्णयाला अत्यल्प प्रतिसाद आहे. अनेक जण जाहिराती व चित्रपटातील तंबाखू व सिगारेट सेवन पाहून चित्रपटातील नायकाचे अनुकरण करतात.
किशोरवयीन मुले त्याचे जास्त अनुकरण करताना दिसतात. तशा प्रकारचे चित्रपटात दाखवले जाऊ नये, याची नैतिक जबाबदारी कलाकारांनी घेतल्यास ते टाळणे शक्य आहे. तंबाखूचे उत्पादन रोखल्यास तंबाखू बाजारात येणार नाही. तसे झाल्याशिवाय समाजाला लागलेली कीड समूळ नष्ट करता येणार नाही, असे डॉ. हेरुर यांनी सांगितले.