डोंबिवलीकरांच्या समस्येला मुंबईकर सरसावले, कलेक्टर लँडसंदर्भात आज मुंबईत मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 06:11 PM2018-02-14T18:11:08+5:302018-02-14T18:11:24+5:30
कलेक्टर लँडची समस्या डोंबिवलीसह मुंबईमध्ये हजारो रहिवाश्यांना भेडसावत आहे. त्यासाठी डोंबिवलीकर नागरिकांनी आवाज उठवल्याची नोंद घेत मुंबईतील ही समस्या मांडणा-या रहिवाश्यांनी डोंबिवलीकरांना सहकार्य करण्यासाठी साद दिली आहे.
डोंबिवली: कलेक्टर लँडची समस्या डोंबिवलीसह मुंबईमध्ये हजारो रहिवाश्यांना भेडसावत आहे. त्यासाठी डोंबिवलीकर नागरिकांनी आवाज उठवल्याची नोंद घेत मुंबईतील ही समस्या मांडणा-या रहिवाश्यांनी डोंबिवलीकरांना सहकार्य करण्यासाठी साद दिली आहे. त्यासाठी मुंबईत बांद्रा येथे होणा-या मोर्चामध्ये डोंबिवलीच्या नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन संयुक्त संघर्ष समितीने केल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने लादलेल्या जाचक अटी आणि बेकायदेशीर शर्ती, तसेच महसूल विभागाच्या जमिनदारी वृत्तीचा निषेध करण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. त्यासाठी डोंबिवलीतील काही नागरिक जाणार असल्याचे सांगण्यात आले. कलेक्टर जमिनींवरील बांधकामांचा प्रश्न रेंगाळला असून शर्तभंगाच्या नोटीस पे नोटीसीना नागरिक कंटाळले आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये अस्वस्थ भावना असून त्यांच्यासह कुटुंबीयांवर टांगती तलवार आहे. त्यासाठी डोंबिवलीतील काही निवडक नागरिकांनी माजी नगरसेवक राजन मराठे, मनसेचे नेते राजू पाटील यांच्यासमवेत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची पाच दिवसांपूर्वी पुन्हा भेट घेतली होती. त्यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली, कलेक्टर जमिनींचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी साकडे घातले. मुख्यमंत्र्यांनीही आठवडाभरात त्यासंदर्भात सर्व संबंधित अधिका-यांसमसवेत चर्चा करणार असल्याचे आश्वस्थ केल्याचे मराठे म्हणाले. त्यावेळी डोंबिवलीकरांसमवेत अनंत कर्वे, आशिष वैद्य यांसमवेत अनंत ओक आदींनी डोंबिवलीतील शेकडो इमारतींची बाजू मांडत राज ठाकरेंना नागरिकांसाठी तात्काळ उपाययोजना करा असे साकडे घातले.
दोन वेळा झालेल्या भेटीतून काहीही निष्पन्न होत नसेल तर भेटायचे कशाला असा सवाल नाराज नागरिकांनी केला. ठाणे जिल्हाधिका-यांनी दिलेल्या नोटीसचा आधार घेत ६२ टक्के प्रिमियम भरायचा तरी कसा, जगायचे तरी कसे असा सवाल ज्येष्ठांनी केला. ही समस्या सोडवण्यासाठी सन्मित्र सोसायटीचे राजेंद्र देशमुख सह, गुरुदत्त सोसायटी प्रमोद जोशी, शोभा ककेतकर, डोंबिवली सोसायटी आशिष वैद्य, हनुमान सोसायटी यशवंत लिमये, अनंत ओक, कृष्णा म्हात्रे, दिग्विजय सोसायटी चित्रा पराडकर, गणेश सोसायटी प्रमोद जाधव, तसेच अनंत कर्वे आदींनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आहे. मुंबईत होणा-या मोर्चामध्ये येथून त्रस्त नागरिकही जाणार असून ते मुंबईत प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांसह संबंधित अधिका-यांकडे दाद मागणार असल्याचे कर्वे म्हणाले.