चाकरमान्यांचे कोकणात जाण्याचे अर्ज पाहणार कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:51 AM2020-07-29T00:51:20+5:302020-07-29T00:51:32+5:30

गणेशोत्सवाचे वेध : ई-पास मिळवण्यात कंटेनमेंट झोनचा अडथळा !

Mumbaikars's application to go to Konkan will be tested | चाकरमान्यांचे कोकणात जाण्याचे अर्ज पाहणार कसोटी

चाकरमान्यांचे कोकणात जाण्याचे अर्ज पाहणार कसोटी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाच्या प्रादुर्भावात एमएमआर रिजन वगळता अन्यत्र जाण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला असून, वैद्यकीय दाखला आणि महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांचा ना हरकत दाखला ई-पास मिळण्यासाठी महत्त्वाचा असतो. परंतु सद्य:स्थितीत कोरोनाचे वाढते रुग्ण आणि कंटेनमेंट झोनची वाढती संख्या पाहता ई-पास मिळविण्यासाठी नागरिकांची चांगलीच परवड होताना दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्याकरिता चाकरमानी मोठ्या प्रमाणात अर्ज करतील तेव्हा खरी कसोटी लागणार आहे.
ई-पास मिळण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाइटवर एक विशेष फॉर्म बनविण्यात आला असून त्यानुसार वैद्यकीय प्रमाणपत्रासह आवश्यक ती कागदपत्रे आणि माहिती भरल्यास हा ई-पास जारी केला जातो. या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कल्याण परिमंडळ ३ च्या पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. याच पथकाकडून मे महिन्यात बनावट कागदपत्रांद्वारे ई-पास बनवून देणाºया दोघांना अटक करण्यात आली होती. लोकांच्या असहायतेचा आणि अज्ञानाचा गैरफायदा सायबर कॅफेचालक घेत होते. खडकपाडा परिसरात असणाºया सायबर कॅफेमधून हा प्रकार सुरू होता. त्यामुळे झटपट ई-पास मिळविण्याच्या नादात फसवणूक होण्याची शक्यता आजही नाकारता येत नाही. दरम्यान, कागदपत्रांच्या पडताळणीत शंका आली तर चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करीत असल्याचे पथकाचे म्हणणे आहे.
ई-पास मिळविताना ‘नो कंटेनमेंट झोन’ हा दाखला अतिशय महत्त्वाचा ठरतो. परंतु तो वेळेवर मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांकडून तो दाखला दिला जातो. मात्र शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी तो उपलब्ध होत नाही. त्यात नागरिक कंटेनमेंट झोनमधील असेल तर त्याला दाखला मिळत नाही. यात अत्यंत निकड असलेली व्यक्ती, तसेच विशेषकरून गर्भवती स्त्रियांची परवड होताना दिसते.

केवळ वैद्यकीय दाखला करा बंधनकारक
ई-पास हा विनामूल्य उपलब्ध होतो. परंतु अटी-शर्ती पूर्ण करू शकत नसलेले, पण ई-पासची नितांत गरज असलेले नागरिक आपसूकच पैसे देऊन ई-पास मिळवत आहेत.
काही ठिकाणी फसवणुकीचे प्रकारही उघड झाले आहेत. यावर पोलिसांची करडी नजर आहे. मात्र येऊ घातलेल्या गणेशोत्सव काळात कोकणात जाणाºया चाकरमान्यांची ई-पास मिळविण्यासाठी चांगलीच कसरत होणार आहे.
ई-पाससाठी ‘नो कंटेनमेंट झोन’चा दाखला अत्यावश्यक असतो. लॉकडाऊन बहुतांश ठिकाणी उठवण्यात आले आहे. त्यामुळे वैद्यकीय दाखला बंधनकारक करा, परंतु ‘नो कंटेनमेंट झोन’ची अट वगळण्याची मागणी नागरिकांची आहे.

Web Title: Mumbaikars's application to go to Konkan will be tested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.