मुंबईच्या अप्पर वैतरणाचे पाणी कोका-कोला कंपनीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 04:37 AM2019-04-05T04:37:49+5:302019-04-05T04:38:19+5:30
कारवाईची मागणी : टेंभा ग्रामपंचायत सरपंचाची तक्रार
कसारा : शहापूर तालुक्यातील धरणालगतच्या शेकडो गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असताना, अप्पर वैतरणा धरणातून वाडा तालुक्यातील कोका-कोला कंपनीला केल्या जाणाऱ्या पाण्याच्या विक्रीवर टेंभा ग्रामपंचायतीने आक्षेप नोंदवला आहे.
अप्पर वैतरणा धरण हे मुंबई महानगरपालिकेचे आहे. येथील पाणी मध्य वैतरणा धरणात सोडून, तेथून मोडकसागरमध्ये सोडले जाते. मोडकसागरमध्ये २० पंप लावून हे पाणी वाडा तालुक्यातील गांधारे येथील बंधाऱ्यात सोडण्यात येते. गांधारे बंधाºयातून हे पाणी कोका-कोला या वाडास्थित कंपनीला व्यावसायिक हेतूने विकले जाते. वास्तविक गांधारे बंधारा हा वाडा तालुक्यातील कुडूस गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आला आहे. दुसरीकडे कुडूससह शहापूर तालुक्यातील धरणालगतच्या टेंभा, वैतरणा, अजनुप, उठावासह शेकडो गावे पाणीबाणीने त्रस्त आहेत.
मोडकसागर धरण ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहे, त्या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. याप्रकरणी टेंभा ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा आमले यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. धरण परिसरातील गावे तहानलेली असताना व्यावसायिक वापरासाठी पाणी देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ अनिल घोडविंदे यांनी केली आहे.
धरण क्षेत्रातील पाणी कोणत्या ना कोणत्या कारणाने वाडा तालुक्यातील गांधारे बंधाºयात सोडण्यात येते. या बंधाºयातून ते पाणी कोका-कोलाला पुरवले जाते. याप्रकरणी कारवाई व्हावी.
- एकनाथ कोरे, उपसरपंच, टेंभा