मुंब्य्राच्या कलंकित प्रतिमेने अस्वस्थता : सूडापोटी स्फोटके लपवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 05:50 AM2017-08-10T05:50:49+5:302017-08-10T05:50:49+5:30
यापूर्वी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्तींना अटक झाल्यामुळे अगोदरच मुंब्रा शहर बदनाम झाले असताना आता स्थानिक रहिवाशांच्या वैयक्तिक वादापोटी स्फोटके ठेवून पुन्हा एकदा शहराला बदनाम केल्याबद्दल स्थानिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
- कुमार बडदे
मुंब्रा : यापूर्वी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्तींना अटक झाल्यामुळे अगोदरच मुंब्रा शहर बदनाम झाले असताना आता स्थानिक रहिवाशांच्या वैयक्तिक वादापोटी स्फोटके ठेवून पुन्हा एकदा शहराला बदनाम केल्याबद्दल स्थानिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
येथील एका व्यावसायिका बरोबर असलेल्या वादामुळे त्याच्या जागेत भंगार अवस्थेत उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात मोठ्या प्रमाणावर स्फोटके ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले. यापूर्वी मुदब्बीर या तरुणाला एनआयएच्या पथकाने अटक केली. तो इसिस संघटनेकरिता तरुणांची भरती करीत असल्याचा संशय होता. त्यानंतर आणखी एकाला अटक केली. ओमर उर्फ नाझिम याला मुंबई दहशतवादी पथकाने अटक केली होती.
मुंब्रा शहर सातत्याने दहशतवादी कारवाया, स्फोटके, अनधिकृत बांधकामे, गुन्हेगारी याकरिता प्रकाश झोतात येत आहे. शहराची सतत बदनामी होत असल्याने येथे राहणारा एखादा तरुण कुठे रोजगाराकरिता गेला व त्याने मुंब्रा येथील पत्ता सांगितला की, त्याला नोकरी नाकारली जाते. मुंब्रा येथील मुलींशी लग्न करण्यास नकार दिला जातो. कुठेही मुंब्रा येथील रहिवासी असल्याचे सांगितल्यावर लोक समोरील व्यक्ती जणू दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्यासारखी संशयाने पाहिले जाते. शहरातील सामाजिक संघटना, काही राजकीय नेते, पत्रकार, स्थानिक नागरिक शहराची व पर्यायाने येथील रहिवाशांची ही ओळख पुसण्याकरिता धडपडत असताना सूड भावनेतून अद्दल घडवण्याकरिता स्फोटके ठेवण्याची क्लृप्ती वापरात आणण्यामागे शहरातील काही मूठभर लोकांच्या मनात मुंब्रा आणि दहशतवाद ही ओळख किती घट्ट रुजली आहे, याचाच प्रत्यय येतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
वैयक्तिक वादातून शहराला बदनाम करणाºयांविरोधात सक्त कारवाई करण्यात यावी.
-शिमम खान, विभागीय अध्यक्ष, राष्ट्रवादी पार्टी
वैयक्तिक वादामुळे स्फोटके ठेवल्याने शहर बदनाम झाले. ही अंत्यत खेदाची बाब आहे. असा प्रकार व्हायला नको होता.
-इसाहक बिराजदार,
दूरदर्शनवरील संहिता लेखक व स्थानिक नागरीक
शहराचे नाव उज्ज्वल व्हावे यासाठी प्रयत्न करण्या ऐवजी सूडबुद्धीने शहराची बदनामी करणाºयांवर कडक कारवाई करण्यात यावी.
-नजिमुद्दीन मलिक, स्थानिक नागरीक