मुंब्य्रातही अबोली रिक्षा चालवायला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:24 AM2019-01-18T00:24:42+5:302019-01-18T00:24:54+5:30

मुस्लिम महिलांची मागणी : अड्ड्यांवर उद्याने उभारा

In Mumbra, allow Aboli rickshaw to run | मुंब्य्रातही अबोली रिक्षा चालवायला द्या

मुंब्य्रातही अबोली रिक्षा चालवायला द्या

Next

- कुमार बडदे


मुंब्रा : अनेक पडीक जागांपाशी युवक दिवसाढवळ्या अमली पदार्थांचे सेवन करताना दिसतात. अशा जागांवर उद्याने बांधा. ठाण्यातच कशाला मुंब्रा येथेही आम्हाला अबोली रिक्षा चालवायला द्या, या व अशा अनेक सूचना मुस्लिम महिलांनी गुरुवारी सेफ्टी आॅडिट जनसुनावणी (मुंब्रा-कौसा) अर्थात महिलांच्या नजरेतून परिसरातील सुरक्षितता या कार्यक्रमात केल्या. महिलांच्या काही सूचना ऐकून उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिकारी अवाक झाले आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


नागरिकांची कामे जलदगतीने व्हावीत, यासाठी पॅनल पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या. परंतु, पॅनलमधील काही नगरसेवक प्रभागातील कामे एकमेकांच्या अंगावर ढकलतात, त्यामुळे कामे जलद होतील, ही आशा फोल ठरल्याबाबतची नाराजी महिलांनी व्यक्त केली. मुंब्य्रातील अचानकनगर भागातील नाजिमा कुरेशी या महिलेने थेट महापौर मीनाक्षी शिंदे यांनाच ‘अब जाये तो जाये कहा’, असा नेमका सवाल केला. निवडणुकीच्या काळात मतदारांच्या घरोघरी जाऊन आस्थेने चौकशी करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यानंतर प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्र मात रेतीबंदर येथील पुष्पा घाडगे, शंकर मंदिर येथील सायरा बानो, श्रीलंका परिसरात राहत असलेली मशिरा नाईक, गावदेवी येथे राहत असलेल्या मनीषा महाकाळ, परवीन शेख आदी महिलांनी त्याच्या परिसरातील व सुरक्षेबाबतच्या समस्या मांडल्या.


अनेक रस्त्यांवर पदपथ दिवे नाहीत, तर आपण महिलांच्या सुरक्षेबाबत काय बोलतो, बससेवा सक्षम नसल्याने गर्दीच्या गाड्यांमध्ये महिलांना त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन करणाºयांवर कारवाई करा, अनेक भागांत रात्रीची पोलिसांची गस्त वाढवा, अशा मागण्या महिलांनी केल्या. ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या स्वातिजा परांजपे यांनी दारूप्रमाणेच इतर अमली पदार्थाची नशा हा सामाजिक प्रश्न आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात आली असल्याचे प्रतिपादन केले. स्मार्ट सिटी योजना राबवताना नेमकी गरज कशाकशाची आहे, ते या कार्यक्र मामुळे कळले, अशी कबुली उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. महिला पोलीस उपनिरीक्षक लांडे यांनी अनेक ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरू असून एक लाख नागरिकांसाठी एक पोलीस उपलब्ध असल्याने प्रत्येक वेळी प्रत्येकापर्यंत पोलीस पोहोचू शकत नसल्याची खंत व्यक्त केली. मी स्वत: कशी सुरक्षित राहीन, याची सुरुवात प्रत्येक महिलेने स्वत:पासून करण्याचा सल्ला लांडे यांनी दिला. तसेच विनाकारण रात्रीअपरात्री घराबाहेर पडू नका, असा धक्कादायक सल्लाही त्यांनी दिला.


यावेळी मुंब्रा समितीच्या अध्यक्षा अनिता किणे, संघर्ष महिला संघाच्या अध्यक्षा ऋता आव्हाड, नगरसेविका सुनीता सातपुते, सुलोचना पाटील, आशरीन राऊत, हाफिजा नाईक, फरजाना शेख, आदी उपस्थित होत्या.

स्वत: स्वत:वर लादलेली बंधने झुगारा
महिलांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पातळीवर हेल्पलाइन सुरू करण्यात यावी. नशा करणारे जेथे जमा होत असतील, त्या ठिकाणावर सातत्याने कारवाई करावी, असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पोलिसांना केले. ‘सातच्या आत घरात’ ही महिलांनी स्वत: स्वत:वर
लादून घेतलेली बंधने झुगारण्याचे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.
केवळ प्रशासनाच्या नावाने आरडाओरडा न करता प्रभागातील समस्या लोकप्रतिनिधीसमोर मांडा त्यांनी त्या सोडवल्या नाहीत, तर त्या घेऊन माझ्याकडे या, असे महापौरांनी दिले. महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी ठाण्याप्रमाणे मुंब्य्रातही महिला चालक असलेल्या अबोली रिक्षा सुरू करण्यासाठी प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.

Web Title: In Mumbra, allow Aboli rickshaw to run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.