मुंब्रा बायपास बनलाय पोलिस ‘एन्काऊंटर झोन’! याच भागात सापडला होता मनसुख हिरेनचाही मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 07:07 AM2024-09-26T07:07:01+5:302024-09-26T07:07:24+5:30
खूप वर्षांपूर्वी मुंब्रा पोलिसांनी याच भागात खिडकाळीमधील एका गुंडाचा खात्मा केला होता
ठाणे : ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मुंब्रा बायपासवरील तीन किलोमीटरचा परिसर निर्जन असून, या भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. याच परिसरात अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या चकमकीमध्ये मृत्यू झाला. याआधी ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांचा मृतदेह याच भागात पोलिसांना मिळाला होता. त्याआधी खूप वर्षांपूर्वी मुंब्रा पोलिसांनी याच भागात खिडकाळीमधील एका गुंडाचा खात्मा केला होता. त्यामुळे मुंब्रा बायपास ठाण्यातील ‘एन्काऊंटर झोन’ आहे. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्सचा बँक रोड व वर्सोवा येथील गार्डन परिसर हा एकेकाळी असाच एन्काऊंटर स्पेशालिस्टचा आवडता एन्काऊंटर झोन होता.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षयचा ठाणे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाल्यामुळे अनेक वादांना तोंड फुटले आहे. मुंब्रा बायपासवरील या निर्जन व सीसीटीव्हीच्या कक्षेत नसलेल्या रस्त्यावरून अक्षयला का आणले, त्याचा एन्काऊंटर करायचा होता म्हणूनच हा परिसर निवडला का? असे सवाल केले जात आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ मिळालेल्या स्फोटकांच्या कारचे मालक आणि या प्रकरणातील एकमेव साक्षीदार मनसुख हिरेन यांचा मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणातही वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता. हिरेन यांचा मृतदेह याच भागातील मुंब्रा खाडी परिसरात मार्च २०२१ मध्ये मिळाला होता. हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य आहे. रात्री तेथे अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे लूटमारीच्या घटना घडतात. अनेकजण ठाण्याकडे जाण्याकरिता भिवंडी बायपास किंवा महापेचा पर्याय निवडतात. या भागात पोलिस चौकीही नाही. मुंब्रा देवीकडे जाणाऱ्या या मार्गावर जोडप्यांना लुटण्याचे प्रकारही घडले आहेत.
अनेक योगायोग कसे जुळले?
अक्षयचा मृत्यू ज्या पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांच्या बंदुकीतील गोळीमुळे झाला ते मध्यवर्ती शोध पथकात १५ दिवसांपूर्वी दाखल झाले. वेगवेगळ्या कारणांनी यापूर्वी ते वादग्रस्त ठरले होते.
एक आरोपी शिंदेंच्या ताब्यातून पळाल्यामुळे त्यांचे निलंबन झाले होते. एन्काऊंटरफेम रवींद्र आग्रे, वादग्रस्त प्रदीप शर्मा यांच्या पथकातही ते होते. त्यामुळेच शिंदेंकडे सीआययूचा चार्ज येणे, अक्षयच्या दुसऱ्या पत्नीने केलेल्या तक्रारींचा तपास सोपवला जाणे आणि मुंब्रा बायपासवरच अक्षय प्रक्षुब्ध होणे, हे योगायोग कसे जुळून आले, असे सवाल उपस्थित होत आहेत.
मुंब्रा बायपासवरील फुटेज ताब्यात घेणार
ठाणे शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सध्या ८०० सीसीटीव्ही बसवले आहेत. कल्याणमध्ये ५०० सीसीटीव्ही आहेत. मुंबईत दहा हजारांच्या घरात सीसीटीव्ही आहेत. राज्य मंत्रिमंडळाने सुमारे ६०० कोटी खर्च करून ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सहा हजार सीसीटीव्ही लावण्याला मंजुरी दिली आहे. तळोजा ते मुंब्रा बायपास या मार्गावरील सर्व सीसीटीव्हींचे फुटेज जपून ठेवून ते ताब्यात घेण्याचे पत्र संबंधितांना दिले आहे, अशी माहिती ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.