ठाणे हादरलं! १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन बाथरूमच्या खिडकीतून खाली फेकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 20:01 IST2025-04-08T20:00:09+5:302025-04-08T20:01:04+5:30
मुंब्रा परिसरात एका १० वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली.

(प्रातिनिधीक छायाचित्र)
Mumbra Crime: ठाण्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात १० मजली निवासी इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये १० वर्षांच्या मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर १० वर्षांच्या या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सोमवारी रात्री उशिरा पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला बाथरूमच्या खिडकीतून फेकून दिल्याबद्दल मुंब्रापोलिसांनी २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली.
सोमवारी रात्री ११.४८ वाजता मुंब्रा परिसरातील सम्राट नगर येथील श्रद्धा प्रति इमारतीत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. १० वर्षीय मुलीच्या मृतदेहाची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली. पीडित मुलगी ही इमारतीची रहिवासी नसल्याचे समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलगी इमारतीमध्ये कशी घुसली याचा तपास पोलिसांनी सुरु केला होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पीडित मुलगी अर्धनग्न अवस्थेत होती.
इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या व्यक्तीच्या घरी पाणी येत नव्हते. त्यामुळे तो आतमध्ये पाहण्यासाठी गेला असता मोठा आवाज झाला. त्याने खिडकी उघडून पाहिले तर तिथे एका १० वर्षांच्या मुलीचा मृतदेह पडलेला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. लोकांची चौकशी केल्यानंतर आणि इमारतीतील घरांची तपासणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना २० वर्षीय तरुणावर संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हा मूळचा बिहारचा रहिवासी असल्याचे समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने रात्री ९:३० वाजता अल्पवयीन मुलीला खेळण्यांचे आमिष दाखवून त्याच्या घरामध्ये नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिला बाथरूमच्या खिडकीतून फेकून दिले.