ठाण्यातील मुंब्रा, लोकमान्यनगर आणि किसननगर भागात पोलिसांची ड्रोनद्वारे नागरिकांवर करडी नजर
By जितेंद्र कालेकर | Published: April 28, 2020 01:43 AM2020-04-28T01:43:35+5:302020-04-28T01:51:42+5:30
दाट लोकवस्तीची ठिकाणे तसेच बाजारपेठांमधील गर्दीच्या परिसरावर थेट आकाशातून नजर ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन ड्रोन कॅमेरे दिले आहेत. लोकमान्यनगर, किसननगर आणि मुंब्रा या भागातील नागरिकांवर पोलिसांकडून या ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहरातील दाट लोकवस्तीची ठिकाणे तसेच बाजारपेठांमधील गर्दीच्या परिसरावर थेट आकाशातून नजर ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन ड्रोन कॅमेरे दिले आहेत. आधी दोन कॅमेरे उपलब्ध असल्यामुळे आता चार कॅमेऱ्यांद्वारे लोकमान्यनगर, किसननगर आणि मुंब्रा या भागातील नागरिकांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकीकडे नागरिकांना कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी त्यांच्यावर कारवाई करता करता ठाण्यातील सुमारे २२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यात बहुतांश पोलिसांना विलगीकरणातही ठेवावे लागले. पोलिसांचे बळ कमी पडत असतांना सोशल डिस्टसिंगची अंमलबजावणी व्हावी, या दृष्टीने ठाणे शहर पोलिसांनी भिवंडी आणि मुंब्रा या परिसरासाठी आधीच दोन ड्रोन कॅमेºयांद्वारे नजर ठेवली आहे. आता वागळे इस्टेट परिमंडळातील किसननगरसारख्या एकाच भागात कोरोनाचे ४२ रुग्ण आढळल्याने या भागातही ड्रोनद्वारे नजर ठेवण्याची व्यूहरचना वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी केली आहे. त्यानुसार आता वागळे इस्टेट येथील किसननगर, भटवाडी, महाराष्टÑनगर, श्रीनगर, पडवळनगर, इंदिरानगर तसेच याआधी सील केलेला लोकमान्यनगर या ठामपा प्रभाग क्रमांक सहाच्या परिसरावरही ड्रोनद्वारे श्रीनगर आणि वर्तकनगर पोलीस नजर ठेवणार आहेत. किमान दिड ते दोन किलोमीटरच्या परिसरात सुमारे १५०० मीटर उंचीवरुन हे ड्रोन कॅमेरे फिरणार आहेत. त्यामुळे पोलिसांना एकाच ठिकाणावरुन गर्दी होणाºया ठिकाणी नागरिकांवर सहज नजर ठेवता येणार आहे. यातून घरातून बाहेर पडणा-यांचे छायाचित्रही काढले जाणार असून संबंधितांना ड्रोनवरील ध्वनीक्षेपकाद्वारे कारवाईचा इशाराही दिला जाणार आहे.
‘‘ड्रोन कॅमे-यांद्वारे एकाच ठिकाणावरुन एक ते दोन किलोमीटरच्या परिसरावर नजर ठेवली जाणार आहे. जिथे व्यक्तीश: पोहचणे शक्य नाही, अशा ठिकाणीही ड्रोनचा प्रभावीपणे उपयोग होणार आहे. यातून ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन वजा इशारा केला जाईल. तरीही नागरिकांनी गर्दी केल्याचे आढळल्यास संबंधितांवर साथ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाईल.’’
बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर