'ती' शाखा माझ्या नावावर, मी शिंदेंसोबत; मुंब्र्यातील वयोवृद्ध शिवसैनिक आला समोर अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 06:09 PM2023-11-11T18:09:42+5:302023-11-11T18:12:37+5:30
मुंब्र्यातील शिवसेनेची शाख पाडल्याच्या मुद्द्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वादात एक वयोवृद्ध शिवसैनिकाची एन्ट्री झाली आहे.
ठाणे-
मुंब्र्यातील शिवसेनेची शाख पाडल्याच्या मुद्द्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वादात एक वयोवृद्ध शिवसैनिकाची एन्ट्री झाली आहे. जी शाखा पाडण्यात आली त्या शाखेचं अॅग्रीमेंट आपल्यावर असून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत असल्याचा दावा उद्धवराव जगताप या जुन्या शिवसैनिकानं केला आहे. त्यांचं वय ते ९६ वर्ष असल्याचं सांगतात.
"शाखा माझ्या नावावर आहे आणि ती शिवसेनेची आहे. शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे. मग मी एकनाथ शिंदेंसोबत असणार. दिघे साहेब असताना ही शाखा बांधली होती आणि मी त्यावेळी उपस्थित होतो. तुमच्या नावावर शाखा करायची आहे असं स्वत: दिघे साहेबांनी तेव्हा म्हटलं होतं आणि आजही याचं अॅग्रीमेंट माझ्या नावावर आहे. उद्धव ठाकरेंनी ठाण्यात एकतरी शाखा बांधली आहे का?", असं ज्येष्ठ शिवसैनिक उद्धवराव जगताप म्हणाले.
मुंब्र्यातील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढत शिंदे गटाने ही शाखा जेसीबीने जमीनदोस्त केल्याने गोंधळ उडाला होता. या शाखेच्या पाडकामावरून ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाला आहे. संबंधित शाखेसह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट मुंब्र्यात पोहोचले आहेत. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण असून दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
उद्धव ठाकरे मुंब्र्यात येण्यावरही जगताप यांनी भाष्य केलं. "उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र असल्यानं त्यांच्याबद्दल आदरच आहे. पण त्यांनी कधीच इथल्या शाखेला भेट दिली नाही. मग आज ते का येत आहेत? ते कुठेच जात नव्हते. कुणाला भेटत नव्हते. आज ते एकनाथ शिंदेंमुळे घराबाहेर पडू लागले आहेत", असंही उद्धवराव जगताप म्हणाले. तसंच शिवसेनेची शाखा माझ्या नावावर आहे, आजही आम्ही त्याचा कर भरतो. यापुढेही शाखा सुरु राहतील आणि शाखेतून लोकांची कामं होत राहतील. शाखेवरुन होणारे वाद अत्यंत चुकीचे आहेत. ज्या शाखा आम्ही बांधल्या. त्यावर तुम्ही कसले दावे करता. ठाण्यात एकतरी शाखा त्यांनी बांधलेली दाखवावी, बाळासाहेबांच्या विचारांचे लोक त्या शाखेत बसलेले दाखवावेत, अशीही जोरदार टीका जगताप यांनी केली आहे.