मुंब्रादेवी हेच नाव योग्य, मनसेचाही नामांतराला पाठींबा; भाजपच्या मागणीचं समर्थन
By अजित मांडके | Published: February 8, 2023 06:05 PM2023-02-08T18:05:12+5:302023-02-08T18:05:49+5:30
मुंब्य्राचे नाव बदलून मुंब्रा देवी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले होते.
ठाणे : मुंब्य्राचे नाव बदलून मुंब्रा देवी करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याच मुद्यावरुन भाजप नेते मोहीम कंबोज यांनी मुंब्य्राचे नाव मुंब्रा देवी करण्यात यावे अशा मागणीचे टीव्ट केले होते. त्यानंतर आता मनसेचे ठाणे पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी देखील मुंब्रा देवी हेच नाव योग्य आहे, असे सांगत या मागणीला पाठींबा दिला आहे. त्यामुळे आता यावरुन आणखी वाद वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
मुंब्य्राचे नाव बदलून मुंब्रा देवी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मुंब्रा हे एक गाव असून, त्याचं नाव मुंब्रा देवीच्या नावावरून पडले आहे. मग तुम्ही महालक्ष्मी स्टेशनचे नाव बदलून महालक्ष्मी देवी असे करणार का? असा सवाल आव्हाड यांनी टीव्टच्या माध्यमातून उपस्थित केला होता. आव्हाड यांच्या या ट्विटला भाजप नेते मोहित कंबोज यांनी उत्तर देत, मुंब्राचं नाव मुंब्रा देवी झाले तर काय समस्या आहे? यापूर्वी देखील अनेक स्टेशनचे नाव बदलण्यात आले, तेव्हा कोणीही काही प्रश्न उपस्थित केले नाहीत. आज मी पुन्हा एकदा मागणी करतो मुंब्य्राचे नाव बदलून मुंब्रा देवी करण्यात यावे असे म्हणत त्यांनी आपले हे टीव्ट मुख्यमंत्नी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. त्यामुळे यावरुन राजकारण तापत असतांनाच आता त्यात मनसचे ठाणे, पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी देखील उडी घेतली आहे.
जाधव यांनी देखील या मागणीला पाठींबा देत असल्याचे टीव्ट केले आहे. मुंब्रा स्टेशन हे मुळचे मुंब्रादेवी हे गाव आहे, त्याठिकाणी देवीचे प्रकट स्थान आहे. त्यामुळे आता मुंब्रा हे अर्धवट नाव आहे, त्यानुसार मुंब्रादेवी हे स्थान करावे अशी मागणी रेल्वे मंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.