रस्ते रुंदीकरणानंतर फेरीवाले झाले मग्रुर

By admin | Published: May 12, 2017 01:45 AM2017-05-12T01:45:53+5:302017-05-12T01:48:07+5:30

फेरीवाला धोरण निश्चित करण्यात तब्बल चार वर्षे आलेले अपयश, या काळात फेरीवाल्यांची चौपट वाढलेली संख्या आणि आता तर नगर पथविक्रेता

Mumrur rallied after widening the roads | रस्ते रुंदीकरणानंतर फेरीवाले झाले मग्रुर

रस्ते रुंदीकरणानंतर फेरीवाले झाले मग्रुर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : फेरीवाला धोरण निश्चित करण्यात तब्बल चार वर्षे आलेले अपयश, या काळात फेरीवाल्यांची चौपट वाढलेली संख्या आणि आता तर नगर पथविक्रेता समिती स्थापन करून फेरीवाल्यांना राजकीय अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा राज्य सरकारचा निर्णय यामुळे ठाण्यातील फेरीवाल्यांची मुजोरी वाढली आहे. महापालिकेने रस्ता रुंदीकरण केल्यावर त्या जागेवर फेरीवाल्यांनी बिनदिक्कत कब्जा करीत व्यापाऱ्यांना आणि महापालिका प्रशासनाला वाकुल्या दाखवल्या आहेत.
गावदेवी भागात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल जाण्यास गेल्या दोनअडीच वर्षांतील घटना कारणीभूत आहेत. आयुक्तपदी संजीव जयस्वाल आल्यावर त्यांनी गेल्या दीड वर्षात ठाण्यातील २०० ते २५० दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली. यामुळे रस्ते मोकळे झाले. ठाणेकरांनी या कारवाईचे तोंडभरून कौतुक केले. मात्र, अल्पावधीत हे मोठे झालेले रस्ते फेरीवाल्यांनी गिळंकृत केले. यामुळे नाराज असलेल्या व्यापाऱ्यांनी महापालिकेचा स्वच्छतेचा कर देण्यास नकार दिला. त्यामुळे पालिका प्रशासन व व्यापारी यांच्यात वाद सुरू झाला. व्यापाऱ्यांना इंगा दाखवण्याकरिता प्रशासनाने त्यांच्या दुकानापुढे कचरा आणून टाकल्याने वाद चिघळला. सर्वच राजकीय पक्षांनी त्यामध्ये उडी घेऊन समेट घडवून आणला. मात्र, फेरीवाल्यांवर काहीच कारवाई होत नसल्याने व्यापारी व काही राजकीय नेते अस्वस्थ होते. त्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी अलीकडेच फेरीवाल्यांवर कारवाई करा आणि एक लाख रुपये मिळवा, असे आव्हान आयुक्तांना दिले. कुणीही आव्हानात्मक भाषा केल्यावर त्याला चोख उत्तर देण्याकरिता ओळखल्या जाणाऱ्या जयस्वाल यांच्या वतीने संदीप माळवी हे बुधवारी बुद्ध पौर्णिमेची सुटी असताना सायंकाळी कारवाईला बाहेर पडले. या वेळी त्यांचा फेरीवाले व नागरिक यांच्याशी वाद झाला. त्याचे पर्यवसान माळवी यांना मारहाणीत झाले. आता फेरीवाल्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार जयस्वाल यांनी केला आहे. मात्र, फेरीवाल्यांची समस्या चिघळण्यास पालिका प्रशासनाचे वेळकाढू धोरणही कारणीभूत आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी शासन निर्णयानुसार सहा महिन्यांत करणे अपेक्षित असतानाही आज सुमारे चार वर्षे उलटूनही अंमलबजावणी झालेली नाही. याच काळात फेरीवाल्यांमध्ये चौपट वाढ झाली. त्यातच, आता नगर पथविक्रेता समिती गठीत करण्यासाठी निवडणूक घेण्यात यावी, असा शासनाचा नवीन आदेश आहे. परंतु, या निवडणुका कुणी, कशा घ्यायच्या, याचा काहीच उल्लेख नसल्याने पालिकेपुढे पेच निर्माण झाला आहे. आठवडाबाजाराच्या नावाखाली फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले आहे. पालिकेने जून २०१४ पासून शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी करण्यास सुरुवात केली. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून फेरीवाल्यांचा बायोमेट्रीक सर्व्हेदेखील पूर्ण झाला आहे. या सर्व्हेनुसार ठाण्यात सुमारे १० हजारांच्या आसपास फेरीवाले असल्याचे सांगण्यात येते. मात्र, काहींच्या मते प्रत्यक्षात फेरीवाल्यांची संख्या त्यापेक्षा जास्त असून ती दिवसागणिक वाढत आहे.
स्टेशन परिसरात व अन्यत्र पालिकेच्या वतीने सतत कारवाई होत असतानादेखील फेरीवाल्यांचे प्रस्थ कमी झालेले नाही. याला जबाबदार ठाणेकर नागरिक आहेत. रेल्वे स्थानकात उतरल्यावर ते याच बेकायदा फेरीवाल्यांकडून साहित्यखरेदी करत असल्याने फेरीवाल्यांचे फावते.

Web Title: Mumrur rallied after widening the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.