बेकायदा गॅरेजवर पालिकेची कारवाई; २० हजारांचा दंड वसूल, व्यावसायिकांमध्ये घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 11:22 PM2021-03-25T23:22:45+5:302021-03-25T23:22:59+5:30
याबाबत नागरिकांच्या तक्रारी सतत येत आहेत. गुरुवारी शिंपी यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने या गॅरेज व कार व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली.
उल्हासनगर : शहरातील कल्याण-बदलापूर रस्त्यावरील बेकायदा गॅरेज व कार मार्केटवर गुरुवारी महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी व पोलिसांनी एकत्रित कारवाई करून २० हजाराचा दंड वसूल केला.
उल्हासनगरमधून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण केल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. रस्त्याजवळ गॅरेज व कार विक्रेते बेकायदा गाड्या लावत असल्याने त्यांच्यावर महापालिकेने अनेकदा कारवाई केली. मात्र कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थे राहते.
याबाबत नागरिकांच्या तक्रारी सतत येत आहेत. गुरुवारी शिंपी यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने या गॅरेज व कार व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच काही साहित्य जप्त केले. रस्त्याच्या बाजूला गाड्या लावून कोंडी करणारे गॅरेज व कार विक्रेत्यांना समज देऊनही पालिका नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे उघड झाले.
शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर रस्त्याजवळ बेकायदा गाड्या उभ्या करणाऱ्यांवर कारवाई तसेच दंड वसूल करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. कोणीही रस्त्याजवळ गाड्या उभ्या करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी हिराघाट विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरही गॅरेजवाल्यांची संख्या मोठी असून रस्त्याच्या कडेला असंख्य ट्रक, गाड्या उभ्या केल्या जातात. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात असून त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.