पोलिसांच्या तक्रारीनंतर ऑर्केस्ट्रा बारच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:32 PM2021-04-22T12:32:31+5:302021-04-22T12:32:48+5:30
Mira Bhayander : या प्रकरणी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी मीरा भाईंदर महापालिकेला पत्र देऊन सदर बेकायदा बांधकाम तोडण्याबाबत कळवले होते.
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या मिड लाईफ या ऑर्केस्ट्रा बारमधील अंतर्गत अनधिकृत बांधकामावर महापालिकेने तोडक कारवाई केली. पोलिसांनी सदर बारमध्ये बारबालांना लपवण्यासाठी बांधलेल्या खोल्या व वाढीव बांधकामावर कारवाई साठी पत्र दिले होते.
पोलिसांनी महिन्याभरा पूर्वी मिड लाईफ ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकली असता यामध्ये बारबालांना लपवण्यासाठी अनधिकृत गुप्त खोल्यांचे बांधकाम आढळून आले होते. मोहित घोष हा सदर बारचा चालक आहे. या प्रकरणी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी मीरा भाईंदर महापालिकेला पत्र देऊन सदर बेकायदा बांधकाम तोडण्याबाबत कळवले होते.
त्याअनुषंगाने आयुक्त दिलीप ढोले यांनी उपायुक्त अजित मुठे यांना तपासणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुठे यांनी विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी दामोदर संखे, कनिष्ठ अभियंता दुर्वेश अहिरे व योगेश अहिरे यांच्यासह स्थळ पाहणी केली असता त्यांना बेकायदा बांधकाम आढळून आले होते .
पालिकेने बंदिस्त खोल्यांचे अनधिकृत बांधकाम तोडून टाकले तसेच बांधकाम धारकावर एम.आर.टी.पी. अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यास दिले. परंतु पोलिसांना सदर अनधिकृत बांधकाम आढळून आले असताना महापालिकेचे स्थानिक प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंत्यांना मात्र ते समजले नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.