पालिका कंत्राटदाराची ठाण्यात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:59 AM2017-11-06T03:59:43+5:302017-11-06T03:59:47+5:30
महापालिकेचे कंत्राटदार संकेत जाधवने रविवारी दुपारी स्वत:वर तीन गोळ्या झाडून आत्महत्या केली. प्रचंड नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासामध्ये पुढे आले आहे.
ठाणे : महापालिकेचे कंत्राटदार संकेत जाधवने रविवारी दुपारी स्वत:वर तीन गोळ्या झाडून आत्महत्या केली. प्रचंड नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासामध्ये पुढे आले आहे.
पाचपाखाडी येथील ३६ वर्षीय रहिवासी जाधव हे महापालिकेमध्ये कंत्राटदार आहेत. रविवारी दुपारी ५.३० वाजताच्या सुमारास गायमुखजवळ त्यांचा मृतदेह स्वत:च्या कारमध्ये आढळला. पोलिसांनी कारची काच फोडून जाधव यांचा मृतदेह बाहेर काढला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड आर्थिक अडचणीत होते. महापालिकेच्या कामांचे ते भागीदारीने कंत्राट घेत होते. काही कामांमध्ये मोठा तोटा झाल्यामुळे त्यांना प्रचंड नैराश्य आले होते. या नैराश्यातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गायमुखजवळ त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभी होती. कारचे इंजीन आणि एसी सुरूच होते. जाधव यांनी परवाना असलेल्या स्वत:च्या पिस्तुलातून छातीमध्ये तीन गोळ्या झाडून घेतल्या. जाधव चालकाच्या सीटवर बसले होते. त्यांचे पिस्तूल पोलिसांना त्यांच्या पायाजवळच आढळले. प्रथमदर्शनी ही आत्महत्येचीच घटना असल्याचे कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले यांनी सांगितले.
संकेत जाधव यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली. विद्या, मला माफ कर. आयुष्यात मी पार हरलो आहे. गैरसमज करून घेऊ नको, असे जाधव यांनी या चिठ्ठीमध्ये पत्नीला उद्देशून लिहिले आहे. चिठ्ठी केवळ ३ ते ४ ओळींची असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना ५ वर्षांचा एक मुलगा असून मोठा भाऊदेखील आहे.