उल्हासनगर रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यावर महापालिकेची कारवाई,
By सदानंद नाईक | Published: November 28, 2023 07:59 PM2023-11-28T19:59:16+5:302023-11-28T19:59:26+5:30
मध्येच कारवाई थांबविल्याने, फोन कोणाच्या चर्चेला उधाण
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विरोधात महापालिका अतिक्रमण विभागाने मंगळवारी कारवाई करून २२ हजाराचा दंड ठोठावला आहे. तर कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले. मात्र महापालिकेने कारवाई मध्येच थांबविल्याने, फोन कोणत्या नेत्यांचा आला. यावरून शहरात चर्चा रंगलीं आहे.
उल्हासनगरात व्यापारी, दुकानदार, फेरीवाले आदींची राजकीय हस्तक्षेपामुळे दादागिरी वाढली असून महापालिकेने अतिक्रमण करणार्यांवर कारवाई सुरू करताच विरोध होत आहे. गेल्या दिवाळी दरम्यानच्या कारवाई वेळी व्यापाऱ्यांनी महापालिकेची कारवाई हाणून पाडली होती. मंगळवारी कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विरोधात महापालिकेने कारवाई सुरू करून २० ते २५ जणांवर कारवाई करीत २२ हजाराचा दंड ठोठावण्यात आला.
मात्र महापालिकेला कारवाई मध्येच सोडून देऊन मंगळवार बाजार येथे कारवाई करावी लागली. एका राजकीय नेत्यांचा फोन आल्याने, कारवाई मध्येच सोडावी लागली. अशी माहिती एका महापालिका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. फोन कोणत्या नेत्यांचा? अशी चर्चा शहरात रंगली असून आमदार कुमार आयलानी यांचे नाव पुढे येत आहे.
महापालिका अतिक्रमण कारवाई बाबत आमदार कुमार आयलानी यांच्याशी संपर्क केला असता, कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावरील महापालिकेची अतिक्रमण कारवाई थांबवा. असा फोन कोणत्याच अधिकाऱ्याला केला नाही. अशी माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली. मात्र आयुक्त अजीज शेख यांच्या सोबत बैठक करून कल्याण-अंबरनाथ मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण बाबत व्यापारी, दुकानदार, फेरीवाले यांच्या सोबत बैठक घेऊन मध्यस्थीची मार्ग काढावा. अशी विनंती केल्याचे आयलानी म्हणाले. दरम्यान शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ता पदपथ व रस्त्यावर अतिक्रमण करणार्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले आहे.