ठाणेकरांना पालिकेने घातली पुन्हा निर्बंधांची वेसण, आयुक्तांनी घेतली बैठक; नियम मोडले तर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 10:17 AM2021-03-18T10:17:33+5:302021-03-18T10:20:30+5:30
या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले तर त्या आस्थापना सील करून जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नाही तोपर्यंत सील काढणार नसल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बुधवारी स्पष्ट केले.
ठाणे : राज्य शासनाने कोरोनाबाबत पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत. यानुसार ठाण्यातील हॉटेल, बार, मल्टिप्लेक्स व इतर आस्थापना रात्री ११.३० पर्यंत सुरू राहणार आहेत, तर दुकाने ९.३० पर्यंत खुली ठेवण्याच्या सुचना आहेत.
या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले तर त्या आस्थापना सील करून जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नाही तोपर्यंत सील काढणार नसल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बुधवारी स्पष्ट केले. या मार्गदर्शक सूचनांचे पालन ३१ मार्चपर्यंत बंधनकारक आहे महापालिका मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना यापूर्वी जे नियम आखले होते, तेच आताही लागू असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांनी बुधवारी हॉटेल, बार, मल्टिप्लेक्स, दुकाने, बाजारपेठांमधील प्रतिनिधी आदींसह इतर आस्थापनांची बैठक घेतली. यावेळी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी नियमांचे पालन केले जाईल, असे स्पष्ट केल्याचे आयुक्तांनी सांगितले. मल्टिप्लेक्स, मॉल, हॉटेल, बार आदी ठिकाणी ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त गर्दी नसावी, मास्कशिवाय परवानगी नाही, प्रत्येकाचे तापमान तपासणे, लक्षणे असणाऱ्यांना प्रवेश नाही, सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांकृतिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.
गृह विलगीकरणासाठी निर्बंधांसह परवानगी
स्थानिक प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली गृहविलगीकरण करण्यात येईल. १४ दिवसांसाठी ते असल्याचे फलक संबंधित घरांवर व इमारतींच्या प्रवेशद्वारावर लावले जाणार आहे. कोराेना पॉझिटिव्ह रुग्णाच्या हातावर क्वॉरंटाईनचा शिक्का मारला जाणार असून, त्याच्या घरातील इतर सदस्यांनी बाहेर जाणे टाळावे व मास्कचा वापर करावा, या आदेशाचे उल्लंघन केल्यास गृहविलगीकरण केलेल्या व्यक्तिला तत्काळ कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.
अंत्यविधीसाठी २०, तर लग्नासाठी ५० व्यक्ती
यापूर्वी लग्न समारंभासाठी १०० माणसांना परवानगी दिली जात होती. परंतु, आता ती ५० माणसांनाच असणार आहे. तसेच अंत्यविधीसाठीही २० माणसांचीच परवानगी असणार आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनांत ५० टक्के उपस्थिती
आरोग्य सेवा व इतर अत्यावश्यक सेवावगळता इतर खासगी किंवा शासकीय कार्यालयांमध्येही पूर्वीप्रमाणे ५० टक्के उपस्थिती ठेवावी लागणार आहे. त्यातही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची जबाबदारी संबंधीत आस्थापनाने घ्यावी. तसेच धार्मिक स्थळांच्या ठिकाणीदेखील ऑनलाइन बुकिंग करून दर्शन घ्यावे.