कार्यालये, गृहसंकुलातील लसीकरणासाठी महानगरपालिकेचे धोरण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:38 AM2021-05-15T04:38:31+5:302021-05-15T04:38:31+5:30

ठाणे : कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबविता यावी यासाठी रुग्णालयांशी संलग्नता प्रस्थापित केलेल्या शहरातील विविध आस्थापना ...

Municipal Corporation announces policy for vaccination in offices and housing complexes | कार्यालये, गृहसंकुलातील लसीकरणासाठी महानगरपालिकेचे धोरण जाहीर

कार्यालये, गृहसंकुलातील लसीकरणासाठी महानगरपालिकेचे धोरण जाहीर

googlenewsNext

ठाणे : कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबविता यावी यासाठी रुग्णालयांशी संलग्नता प्रस्थापित केलेल्या शहरातील विविध आस्थापना आणि गृहसंकुले यांना लसीकरणासाठी परवानगी देणारे धोरण शुक्रवारी महापालिकेने जाहीर केले आहे. याआधारे शहरातील विविध आस्थापना आणि गृहसंकुलांनी पुढाकार घेऊन लसीकरण मोहिमेमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

या धोरणांतर्गत विविध कार्यालये, गृहसंकुले यांना त्यांनी कोणत्याही रुग्णालयाशी संलग्नता प्रस्थापित केल्यानंतर लसीकरण करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कोविन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणी झाल्यानंतर त्या कार्यालयांना, गृहसंकुलांना महापालिकेतर्फे स्वतंत्रपणे साइट मॅनेजर म्हणून समाविष्ट करून घेण्यात येईल. खासगी कार्यालये, गृहसंकुले यांना लसीकरणासाठी परवानगी देताना त्या ठिकाणी प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्षाची सुविधा आहे किंवा नाही याची खात्री करण्यात येणार आहे. डॉक्टर्स, स्टाफ नर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर, इतर आरोग्य कर्मचारी, इंटरनेट, फर्निचर, रुग्णवाहिका, औषधे आदी सुविधा असल्याची खातरजमाही महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे.

लसीकरणाचे लाभार्थी हे शासनाच्या धोरणानुसार निश्चित करण्यात येणार आहेत. त्या त्या आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी, गृहसंकुलांमध्ये वास्तव्यास असलेले रहिवासी, घरगुती काम करणाऱ्या व्यक्ती, सुरक्षारक्षक, माळी, लिफ्टमन, वाहनचालक यांना लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे. लसींचा अपव्यय टाळण्यासाठी लाभार्थ्यांची संख्या ही दहा आणि त्यापटीत असणे आवश्यक राहणार आहे. या केंद्रांसाठी लसीकरणाचा साठा उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी ही संपूर्णतः ती कार्यालये किंवा गृहसंकुले यांची राहणार असून, लसीसाठी किती शुल्क आकारायचे हा अधिकार संबंधित आस्थापनांचा राहणार आहे.

लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची नोंदणी Co-Win ॲपवर करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहणार आहे. लसीकरणानंतर एखाद्या लाभार्थ्यास काही लक्षणे आढळल्यास त्याच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी त्या आस्थापनांची, गृहसंकुलांची राहणार आहे. या धोरणांतर्गत कार्यालये, गृहसंकुले यांना Co-Win ॲपवर वॉक-ईन, तसेच ऑन दी स्पॉट नोंदणी करून लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: Municipal Corporation announces policy for vaccination in offices and housing complexes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.