महापालिका उरकणार २५ मे पर्यंत शहरातील नालेसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 03:07 PM2020-05-13T15:07:43+5:302020-05-13T15:09:52+5:30
कोरोनाचे प्रमाण शहरात वाढत असतांना आता अत्यावश्यक किंवा पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अशातच आता नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेकडून युध्द पातळीवर प्रयत्न सुरु असून नालेसफाईची कामे येत्या २५ मे पर्यंत पूर्ण करण्यात येईल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला.
ठाणे : एकीकडे कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे त्यामुळे शहरातील अत्यावश्यक कामेही प्रलंबित राहू लागली आहेत. परंतु ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नाले सफाईच्या कामांना वेग आला असून येत्या २५ मे पर्यंत शहरातील सर्व नाल्यांची सफाई केली जाईल यासाठीचे प्रयोजन पालिकेने आखले आहे.
शहरातील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाच्या रु ग्णांची संख्या वाढत असून येथील करोना विषाणू संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनापुढे उभे राहीले आहे. शहरात आजच्या घडीला ८०० च्या आसपास कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील रुग्णांवरही उपचार करणे, त्यांना क्वॉरान्टाइन करणे अशी कामे पालिकेला करावी लागत आहेत. या कामात पालिकेची पूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. यामुळे पावसाळ्यापुर्वीची कामे रखडल्याची चिन्हे निर्माण झाली होती. दरवर्षी शहरातील अनेक सखल भागात पाणी साचत असून याशिवाय, शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर सखल भागांव्यतिरिक्त अन्य ठिकाणीही पाणी साचते. नाले शेजारच्या घरांमध्ये पाणी शिरते. तर काही ठिकाणी सोसायटी आणि चाळींमध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे नालेसफाईची कामे रखडली तर यंदा नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे. याशिवाय, आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असतानाच करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबरोबरच आता पावसाळ्यापुर्वी नालेसफाईची कामे करण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहेत. त्यामुळे नालेसफाईची कामे पावसाळ्यापुर्वी पुर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानुसार पालिकेच्या माध्यमातून युध्द पातळीवर नालेसफाईची कामे सुरु झाली आहेत. ही कामे २५ मे पर्यंत पूर्ण होतील असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.
दरम्यान ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी मंगळवारी शहरातील नालेसफाईच्या कामांची पाहाणी केली. त्यामध्ये त्यांनी नाल्याचा प्रवाह मोकळा करणे, नाल्याची खोली वाढविणे, प्रवाहातील अडथळे दुर करण्याबरोबरच ज्या ठिकाणी संरक्षक कठडा बांधण्याची गरज असेल तर त्या ठिकाणी संरक्षक कठडा बांधणे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.