कळव्यातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 10:23 PM2022-05-24T22:23:50+5:302022-05-24T22:24:17+5:30
ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहीम सुरु आहे.
ठाणे:
ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहीम सुरु आहे. मंगळवारी कळवा भागातील वाढीव अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांने करण्यात आली असून यापुढेही ती अशीच सुरु राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
या कारवाईतंर्गत कळवा प्रभाग समिती येथील शंकर मंदिर शेजारी, कळवा येथे ७ कॉलम तसेच कळवा नाका, जुम्मा मस्जिद येथे सहा कॉलम तोडण्याची कारवाई करण्यात आली. सुदाम सोसायटीच्या बाजूला, कावेरी सेतू येथील बांधकामाचे स्लॅब आ िण कॉलम कट करण्यात आले. कळवा मच्छी मार्केट जवळ, बांधकामाचे स्लॅब तोडण्यात आले. मयूर हॉटेल मागे, खारीगाव येथील बांधकामाचे स्लॅब व कॉलम तोडण्यात आले. तसेच रवींद्र हॉटेल मागे, खारीगाव येथील बांधकामाचे स्लॅब तसेच कॉलम निष्कासित करण्यात आले.
ही कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांच्या पथकाने केली.