ठाणे शहरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:45 AM2021-09-06T04:45:08+5:302021-09-06T04:45:08+5:30
ठाणे : ठाण्यात फेरीवाल्यांविरुद्ध ठाणे महापालिकेची धडक मोहीम व्यापक प्रमाणात सुरूच आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर ...
ठाणे : ठाण्यात फेरीवाल्यांविरुद्ध ठाणे महापालिकेची धडक मोहीम व्यापक प्रमाणात सुरूच आहे. रविवारी सुटीच्या दिवशीही शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. हातगाड्या आणि टपऱ्या तसेच स्टॉल जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या कारवाईअंतर्गत नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमधील अलोक हाॅटेल, गावदेवी, तीन हात नाका, राम-मारुती रोड, तलावपाळी दुकानांसमोरील सामान उचलण्यात आले. त्याचबरोबर रस्त्यावरील फेरीवाले हटवून चार बॅग, पाच पुतळे, चायनीज खाद्यपदार्थांचा गाळा, दोन फळांच्या टोपल्या तर स्टेशन परिसर, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी नाका, कोर्ट नाका येथील ठेले, सात कटलरी बॉक्स आणि नऊ फळांच्या पाट्या जप्त केल्या आहेत. माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील तुर्फेपाडा ब्रह्मांड, हिरानंदानी चौक ते श्री मां शाळेच्या परिसरातील कारवाईदरम्यान चार स्टॉल, तीन टपऱ्या आणि दोन प्लास्टिक पेपर तसेच पाच बॅनर पोल तोडण्यात आले. हिरानंदानी इस्टेट येथील आर्केडिया शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकानाबाहेर लावलेल्या चार लोखंडी स्टॉलसह इतरही दुकानांबाहेर लावलेल्या हातगाड्या तसेच उसाच्या चरख्यासह हिरानंदानी रोडवरील भंगार आणि जनरेटर मशीन जप्त करण्यात आली.
दिवा प्रभाग समितीमध्येही दिवा स्टेशन रोड, दिवा आगासन रोड, दातिवली रोड, मुंब्रादेवी कॉलनी आणि शीळ फाटा रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच पदपथावरील अतिक्रमणे हटविण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली. तसेच किरकोळ विक्रेते यांच्यावर कारवाई करून त्यांचे सामान जप्त करण्यात आले.
अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उपआयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, संतोष वझरकर, अलका खैरे आणि सागर साळुंखे, आदींनी अतिक्रमण विभागाचे पथक आणि पोलिसांच्या मदतीने केली.