शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:29+5:302021-08-28T04:44:29+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सुरूच असून, शुक्रवारी कळवा आणि दिवा प्रभाग ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सुरूच असून, शुक्रवारी कळवा आणि दिवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
या कारवाईअंतर्गत कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील टाकोली मोहल्ला येथील तळ अधिक नऊ मजली अनधिकृत इमारतीच्या स्लॅबचे बांधकाम तोडण्यात आले. घोलाईनगर येथील सोमजाई इमारतीच्या तळ अधिक चार मजली इमारतीच्या चवथ्या मजल्याच्या स्लॅबचे बांधकाम तोडण्यात आले. दिवा प्रभाग समिती पटेल कंपाऊंड येथील अनधिकृत गाळा निष्कासित करून आचार गल्ली, म्हापे रोड येथील अनधिकृत फेन्सिंगचे चालू बांधकामही निष्कासित करण्यात आले. दरम्यान, नौपाडा- कोपरी प्रभाग समिती अंतर्गत फेरीवाल्यांवरदेखील कडक कारवाई करण्यात आली आहे.
ही निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उपआयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त अलका खैरे आणि यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साह्याने केली.