नालेसफाईवरही कोरोनाचे सावट, महापालिकेला काढावी लागली फेरनिविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 03:46 PM2020-04-24T15:46:23+5:302020-04-24T15:51:37+5:30
कोरोनामुळे शहरातील अनेक अत्यावश्यक कामे ठप्प झाली असतांनाच आता त्याचा फटका महापालिकेच्या नालेसफाईच्या कामालाही बसल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेने काढलेल्या नालेसफाईच्या कामांच्या निविदेला ठेकेदारांनी प्रतिसादच न दिल्याने पालिकेला आता फेरनिविदा काढावी लागली आहे.
ठाणे : कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण पालिकेची यंत्रणा कामाला लागली असताना दुसरीकडे अत्यावश्यक सेवेत असलेल्या नालेसफाईची निविदा पालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु कोरोनामुळे पालिकेला नालेसफाईच्या फेरनिवदा काढण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे आता निविदा उघडल्या जाणार असल्याचे पालिका म्हणत जरी असली तरी कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने नालेसफाईसाठी ठेकेदारांना सफाई कामगार कुठून मिळणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीमध्ये किती ठेकेदार या कामासाठी स्वारस्य दाखवले याचे उत्तर पालिका देण्यास तयार नाही. याबाबतही शंका निर्माण झाली असल्याने कमीत कमीत कमी मन्युष्यबळ आणि जास्तीत जास्त मशिनरीचा वापर करून यंदाची नालेसफाई करण्याचा पर्याय पालिका प्रशासनाने पुढे आणला आहे.
महापालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई मोहिम राबविली जाते. मात्र गेल्या वर्षीपासून पावसाची अनियमतिता लक्षात घेता यावर्षी सर्व प्रभागातील नालेसफाई ही १० मे पर्यत पूर्ण झालीच पाहिजे असे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देत नालेसफाईसाठी असलेली निविदा प्रक्रि या १५ एप्रिलपर्यत पूर्ण करावी अशा सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी यापूर्वीच प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने महापालिकेच्या संकेतस्थळावर निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये १३ एप्रिल पर्यंत ई- निविदा भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. परंतु या निवेदिला ठेकेदारांना पुढाकार न घेतल्याने पालिकेला प्रथमच नालेसफाईची फेरनिविदा काढावी लागली आहे. त्यात महापालिकेची नालेसफाईची प्रशासकीय प्रक्रि या आणि ठेकेदारांनी केलेली नालेसफाई ही नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नालेसफाईची कामे त्याचत्याच ठेकेदार मंडळीं कडून केली जात आहेत. आॅनलाईन निविदा प्रक्रि या असूनही ही कामे नेहमीच त्याच ठेकेदारांना कशी मिळतात हा संशोधनाचा विषय आहे. परंतु नालेसफाईच्या कामासाठी वर्षभर वाट पाहणारे हे ठेकेदार मात्र यावेळी कोरोना साथीच्या भयाने नालेसफाईची निविदा प्रसिद्ध होऊनही या कामाला प्रतिसाद द्यायला तयार नाही. या निविदेची मुदत संपल्याने ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला या कामाची प्रथम मुदतवाढ निविदा प्रसिद्धीस देण्याची वेळ आली आहे.
यासंदर्भात ठाण्यातील एका पारंपरिक नालेसफाई ठेकेदाराला विचारले असता, कोरोना रोगाच्या भयामुळे कोणीही कामगार मिळत नाही. मोठे नाल्यांची सफाई ही तांत्रिक पध्दतीने होते. त्यासाठी जेसीबी आदी यंत्रणांची मदत घेतली जाते तर लहान लहान नाले ही मनुष्यबळाचा वापर होऊन साफ केले जातात. मात्र यासाठी सध्या कामगारच मिळत नसल्याने या कामांना प्रतिसाद मिळत नाही. दुसरीकडे हे काम अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने ते वेळेत करणे अनिवार्य असल्याने निविदेला कशाप्रकारे प्रतिसाद येईल यावर कामाचे स्वरूप अवलंबून असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र यावर पर्याय म्हणून शक्य असेल तेवढे कमी मन्युष्यबळ वापरून जास्तीत जास्त मशीनचा वापर करण्यावर भर देण्याचा प्रशासनाचा विचार सुरु आहे. यामध्ये रोबोटिक मशीन आणि जेसीबीचा वापर करावा लागेल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लवकरच यावर तोडगा काढला जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.