रहिवाशांचा पालिकेला आता ४८ तासांचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:29 AM2018-05-29T01:29:36+5:302018-05-29T01:29:36+5:30
कोणतीही पूर्वसूचना न देता, नोटीस न बजावता पालिकेने चुकीच्या पद्धतीने रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे
ठाणे : कोणतीही पूर्वसूचना न देता, नोटीस न बजावता पालिकेने चुकीच्या पद्धतीने रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. याबाबत, वारंवार पत्रव्यवहार आणि आंदोलन करूनही पालिका दखल घेत नसल्याने अखेर घोडबंदर, पाचपाखाडी, कळवा, सुभाषनगर, डॉ. आंबेडकर रोड येथील रहिवाशांनी आता पालिकेला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. या कालावधीत आमचे पुनर्वसन त्याच ठिकाणी करण्याची हमी दिली नाही, तर समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी सोमवारी दिला.
महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांत रस्ता रुंदीकरण सुरू आहे. परंतु, आनंदनगर भागात रुंदीकरणात नसलेली घरेदेखील तोडल्याचा आरोप या समितीने केला. डॉ. आंबेडकर रोड भागातील तलावाला नवसंजीवनी देण्याच्या नावाखाली येथील रहिवाशांना बेघर करण्याचे कारस्थान सुरू आहे. वास्तविक पाहता, हे रहिवासी तलावाच्या बाजूला राहत असून पालिकेचे प्रभाग समिती कार्यालयही हे त्यावर उभे असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. त्यामुळे केवळ विकासकांच्या फायद्यासाठीच हे धोरण अवलंबले जात असल्याचे मत समितीचे मुख्य समन्वयक किशोर दिवेकर यांनी केले.
पातलीपाडा येथील शासकीय जमिनीच्या घरावरील निकाल हा रहिवाशांच्या बाजूने लागला आहे. त्यानुसार, उशिरा का होईना जिल्हाधिकारी कार्यालयाला जाग आली आहे. परंतु, पालिकेकडून ९५ पूर्वीचा दाखला मात्र दिला जात नाही. त्यांच्याकडून ही अडवणूक कशासाठी, असा सवालही त्यांनी केला आहे. सुभाषनगर भागात एसआरए योजना राबवण्याचे सांगून मागील कित्येक वर्षांपासून येथील शेकडो रहिवाशांना बेघर केले आहे. परंतु, या योजनेचा विकासक असलेल्या शिवसेना नगरसेवकाकडून मात्र अद्यापही येथील रहिवाशांना घरे मिळालेली नाहीत. शहराच्या इतर भागातही हीच परिस्थिती असून रहिवाशांच्या घरांवर हातोडा टाकला जात आहे.