उल्हासनगरात घातक फटाके विक्रीला बंदी; महापालिका आयुक्तांचे फटाके व्यापाऱ्यांना पत्र
By सदानंद नाईक | Published: October 13, 2022 06:38 PM2022-10-13T18:38:27+5:302022-10-13T18:39:31+5:30
उल्हासनगरात घातक फटाके विक्री करण्यास महापालिकेने बंदी घातली आहे.
उल्हासनगर : शहरातील मुख्य मार्केट व वर्दळीच्या ठिकाणी सुरू असलेल्या फटाक्याच्या दुकानांना नागरिकांकडून विरोध होत आहे. अशा दुकानांनी १२५ डेसिबल पेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांच्या विक्रीवर महापालिकेने बंदी घातली असून बेरीयम सॉल्ट, लिथियम, आर्सेनिक, लीड व मर्क्युरी या घातक फटाक्याच्या विक्रीवर आयुक्त अजीज शेख यांनी मनाई असल्याचे पत्र प्रसिद्ध केले.
उल्हासनगर नेहरू चौकातील एका विनापरवाना फटाक्याच्या दुकानावर गेल्या महिन्यात कारवाई करून ४७ लाख किंमतीच्या फटाक्यांचा साठा सील करण्यात आला. याप्रकरणी बापलेकाला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली. या कारवाईनंतर मुख्य मार्केट व वर्दळीच्या ठिकाणच्या फटाक्याच्या दुकानांना कोणी व कशी परवानगी दिली. यावर प्रश्नचिन्हे उभे राहिले. एकाच परवान्यावर एका पेक्षा अधिक फटाक्याचे दुकाने सुरू असंल्याचा आरोप होत आहे. फटाक्याच्या दुकानाच्या परवान्यांचे नूतनीकरण दरवर्षी केली जाते. अशी माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली आहे.
शहरातील गोलमैदान व दसरा मैदान येथे तात्पुरत्या स्वरूपात दिवाळी सणाच्या दरम्यान फटाके विक्रीला दरवर्षी महापालिकेच्या वतीने दुकानांना परवानगी दिली जाते. यावर्षीही फटाक्याच्या दुकानांना परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. बुधवारी फटाके विक्री करणाऱ्या दुकानदारा सोबत त्यांनी बैठक घेऊन , महापालिका नियम व अटीशर्तीचे पालन करण्यास सांगितले. अशी माहिती नाईकवाडे यांनी दिली. शहरात फटाके विक्री करणारे मोठे व्यापारी असून कोट्यवधींची उलाढाल फटाके विक्रीतून होते. मुंबई, ठाणे, कर्जत, कसारा, कल्याण, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर व ग्रामीण परिसरातून नागरिक व व्यापारी फटाके खरेदीसाठी येतात. यावेळी सर्व नियम पायदळी तुडवून दुकानदार फटाके विक्री करीत असल्याचे चित्र दरवर्षी असते. अशावेळी महापालिका प्रशासन व पोलीस विभाग कारवाई न करता बघ्याची भूमिका वठविते. असा आरोप पर्यावरण प्रेमीकडून होत आहे.
फुटपाथवर फटाक्यांची विक्री
नेहरू चौक परिसर, कॅम्प नं-४ मार्केटसह वर्दळीच्या व गर्दीच्या ठिकाणी फटाक्याचे दुकानदार फुटपाथवर मोठ्या आवाजाचे फटाके उघड्यावर ठेवून विक्री करतात. अश्या वेळी मोठी अप्रिय घटना घडण्याची शक्यता अधिक आहे. यावर पोलीस प्रशासन व महापालिकेने बघ्याची भूमिका न घेता कारवाई करण्याची मागणी होत आहे.