विनापरवानगी खोदकाम करणाऱ्या मेट्रोला महापालिका बजावणार ६४ लाखांची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:42 AM2021-07-28T04:42:17+5:302021-07-28T04:42:17+5:30
ठाणे : पावसाळा सुरू झाल्यानंतर खोदकाम न करण्याचे आदेश असतानाही ठाणे महापालिका हद्दीत मेट्रो व्यवस्थापनाने इलेक्ट्रिक केबल टाकण्यासाठी ...
ठाणे : पावसाळा सुरू झाल्यानंतर खोदकाम न करण्याचे आदेश असतानाही ठाणे महापालिका हद्दीत मेट्रो व्यवस्थापनाने इलेक्ट्रिक केबल टाकण्यासाठी महापालिकेची परवानगी न घेता घोडबंदर भागातील सूरज वॉटर पार्क येथे ८०० मीटर रस्त्याचे खोदकाम केले. महापालिकेने हे काम थांबविले असून, मेट्रो कंपनीला ६४ लाखांच्या दंडाची नोटीस बजावणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिका हद्दीत मेट्रो चारचे काम सध्या वेगाने सुरू आहे. घोडबंदर भागातही या प्राधिकरणाचे काम सुरू आहे. त्यानुसार २३०० मीटर रस्त्याचे खोदकाम करून इलेक्ट्रिक केबल टाकण्याच्या कामाला परवानगी देण्याच्या मागणीचे पत्र मेट्रो कंपनीकडून ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते; परंतु पावसाळा सुरू होणार असल्याने पालिकेने ही परवानगी नाकारली होती. पावसाळ्यानंतर कामाला परवानगी दिली जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले होते. तरीही मागील आठवड्यात मेट्रो प्राधिकरणाने घोडबंदर भागातील सूरज वॉटर परिसरातील रस्त्यात खोदकाम केले. यासाठी मेट्रोला ६४ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची नोटीस बजावणार असल्याची माहिती नगर अभियंता रवींद्र खडताळे यांनी दिली.