महापालिकेतील माफियांनीच ऑक्सिजन पळवला, सत्ताधारी भाजपा आमदाराचाच गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 05:08 PM2021-04-18T17:08:28+5:302021-04-18T17:09:45+5:30
तर ऑक्सिजन चोरले का? हे तुमच्याच पक्षाच्या महापौर व पदाधिकाऱ्यांना आधी विचारा असा शिवसेनेचा टोला
मीरारोड - वसई विरारसाठीचा ऑक्सिजन मीरा भाईंदरने पळवल्याचा आरोप करून भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपवरच एकप्रकारे ऑक्सिजन चोरीचा ठपका ठेवत माफिया शब्द वापरला आहे. सत्ताधारी भाजपा ह्यावर चिडीचूप असताना शिवसेनेने मात्र लाड यांनी त्यांच्या महापौर आणि पदाधिकाऱ्यांना चोरी केली का? असे विचारले पाहिजे होते असा टोला लगावला आहे .
वसई-विरार साठी येणारे ऑक्सिजन हे माफियांकडून रिकामे केले जात असल्याने कारवाईची मागणी लेखी पत्राद्वारे भाजपा आमदार लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पत्रकारांशी बोलताना लाड यांनी वसई-विरार साठीचा ऑक्सिजन असलेला टँकर मीरा भाईंदर महापालिकेने पळवला व त्यातील काही ऑक्सिजन काढून घेतल्याचा आरोप सुद्धा केला. लाड यांनी मीरा भाईंदर महापालिकेत भाजपाची सत्ता असताना ऑक्सिजन चोरीचा केलेला आरोप आणि माफिया असा शब्द वापरल्याने पालिकेतील सत्ताधारी भाजपाला घरचा आहेर मिळाल्याचे मानले जाते . आश्चर्य म्हणजे पालिकेतील सत्ताधारी भाजपा आ. लाड यांनी केलेल्या गंभीर आरोपावर मूग गिळून असताना शिवसेनेने मात्र मीरा भाईंदर महापालिकेची बाजू घेत आ. लाड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख विक्रमप्रताप सिंह म्हणाले कि, १४ एप्रिलच्या मध्यरात्री नंतर १२ च्या सुमारास ऑक्सिजनचा टँकर धर्माधिकारी व महाजन उपचार केंद्रातील ऑक्सिजन टाकीत ऑक्सिजन भरण्यासाठी आला होता. ह्या टँकर मध्ये ४ केएल इतके ऑक्सिजन मीरा भाईंदरच्या वाट्याचे होते. सदर टँकर भाईंदरला आला म्हणून ४-५ गाड्यातून लोक आले आणि टाकीत ऑक्सिजन भरत असताना टँकर बळजबरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु पालिका अधिकाऱ्यांनी आपल्या कोट्याचा ऑक्सिजन भरून झाल्यावर तो टँकर वसई विरारला सुखरूप पाठवला आहे.
मीरा भाईंदर पालिकेत भाजपाची सत्ता असताना लाड यांनी आधी महापौर , पदाधिकाऱ्यांना ऑक्सिजन चोरला का ? असे विचारले पाहिजे होते. शहरात भाजपचे कोण लुटमारी करते हे लाड यांना माहिती असल्याने त्यांनी असा आरोप केला असावा असा टोला विक्रमप्रताप यांनी लगावला आहे. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सचिन बच्छाव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा पालिकेने आगाऊ पैसे भरले होते व त्या टँकरमधील ४ केएल ऑक्सिजन मीरा भाईंदर महापालिकेच्या वाट्याचे होते असे स्पष्ट केले आहे. रायगड वरून आलेला हा टँकर आधी थेट भाईंदरला आला होता. चालक नवीन असल्याने गॅस टाकीत भरण्यास विलंब झाला. नंतर पहाटे साडे तीनच्या सुमारास पालिका बंदोबस्तात वसई विरारच्या वाट्याचे ऑक्सिजन घेऊन टँकर गेला. आपण पैसे आगाऊ भरल्याची पावती सुद्धा आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मीरा भाईंदर महापालिकेनेच वसई विरारच्या वाट्याचा ऑक्सिजन टँकर पळवला. मी पत्रकार परिषद घेतल्यावर सरकार त्यांचे असल्याने त्यांनी कागदपत्रे मॅनेज केली असा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.