मीरा-भाईंदरमधील पडिक वाहनांविरोधात महापालिकेची कारवाई सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 08:51 PM2018-06-14T20:51:22+5:302018-06-14T20:51:22+5:30
मीरा-भाईंदरमध्ये रस्ते तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी बेवारस वा पडीक अवस्थेत असलेल्या वाहनांविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे
मीरारोड - मीरा-भाईंदरमध्ये रस्ते तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी बेवारस वा पडीक अवस्थेत असलेल्या वाहनांविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. त्यातही रस्ते, पदपथ, उद्याने, मैदाने व अन्य सार्वजनिक ठिकाणी बऱ्याच कालावधीपासून पडून असलेल्या वाहनांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, 48 तासांत वाहन उचलले नाही तर पालिका ते उचलून नेणार आहे.
मीरा-भाईंदरमधील रस्ते, पदपथ तसेच सार्वजनिक मोक्याच्या जागा फेरीवाले, बेकायदा पार्किंग तसेच दुकान चालक आदींनी व्यापलेली आहे. यामुळे नागरिकांना तसेच वाहन चालकांना रहदारीला नेहमीच अडथळा होऊन वाहतूक कोंडी होत असते. पालिका व पोलीस यांच्याकडून यावर ठोस कारवाई होत नाही हे वास्तव आहे. हा सर्व जाच कमी म्हणून की काय, शहरातील रस्ते, पदपथ, स्मशानभूमी, उद्याने, नाके, मैदाने इतकेच आदी अनेक सार्वजनिक ठिकाणी भंगार अवस्थेतील पडीक वाहनं सर्रास काही महिने - वर्षांपासून उभी केलेली आहेत. या वाहनांवर सातत्याने कारवाईची मागणी होत असते.
परंतु कारवाईला पालिका वा पोलिसांना मुहूर्त काही मिळत नव्हता. आता आयुक्त बालाजी खतगावकर यांनी या पडीक - बेवारस वाहनांविरुद्ध कारवाईचे आदेश जरी केले आहेत . त्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांना अशा वाहन मालक व त्या वाहनांवर नोटिसा बजावण्यास सांगण्यात आले आहे . त्यासाठी प्रभाग अधिकारी यांच्यासह कनिष्ठ अभियंता व स्वच्छता निरीक्षक आदींनी अश्या पडीक - बेवारस वाहनांचे सर्वेक्षण करायचे आहे .
महापालिका अधिनियमातील तरतुदी नुसार सदर वाहनां मुळे रहदारीला अडथळा होतो . साफसफाई करणे शक्य होत नसल्याने घाण तशीच राहते . आग लागण्याचा धोका असतो . परिणामी संबंधितांना नोटीस बजावून दोन दिवसात वाहन काढून घेण्याचे सांगण्यात आले आहे . सदर वाहन न काढल्यास महापालिके मार्फत कर्षण करण्यात येईल . ते सोडवण्यासाठी दंड व शुल्क द्यावे लागले . जर 8 दिवसात वाहन सोडवले नाही तर त्याचा लिलाव केला जाईल असे नोटीशी द्वारे बजावले जात आहे .
प्रभाग क्र . 9 मध्ये 20 तर प्रभाग क्र . 22 मध्ये 18 अशी एकूण 38 भंगार वाहने सर्वेक्षणअंती निदर्शनास आली आहेत . तर प्रभाग क्रमांक 15,16,17 मध्ये बेवारस व भंगार अवस्थेत एकुण 25 वाहने आढळून आली आहेत असे आयुक्तांनी कळवले आहे . अन्य भागातील सर्वेक्षण व आकडेवारी घेणे सुरु आहे .