पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी महापालिकेकडून ७ कृत्रिम तलावांची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 06:31 PM2019-08-29T18:31:27+5:302019-08-29T18:34:50+5:30

गेली अनेक वर्षे पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबविणारी ठाणे महानगरपालिका यावर्षीही सज्ज झाली असून यावर्षीही विसर्जन महाघाट आणि कृत्रिम तलावांची कामे अंतीम टप्प्यात आहेत.

Municipal Corporation ready for eco-friendly Ganeshotsav; Creation of artificial ponds | पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी महापालिकेकडून ७ कृत्रिम तलावांची निर्मिती

पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी महापालिकेकडून ७ कृत्रिम तलावांची निर्मिती

Next

ठाणे: गेली अनेक वर्षे पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबविणारी ठाणे महानगरपालिका यावर्षीही सज्ज झाली असून यावर्षीही विसर्जन महाघाट आणि कृत्रिम तलावांची कामे अंतीम टप्प्यात आहेत. तसेच खड्डे भरणीची मोहिमही युद्ध पातळीवर सुरू आहे. तरी नागरिकांनी महापालिकेने निर्माण केलेल्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेला सहकार्य करावे असे आवाहन महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.

ठाणे शहरांमधील तलावांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात येत आहे. गणेश मुर्तीं विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून सर्व गणेश भक्तांनी या कृत्रिम तलावांचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने  करण्यात आले आहे.

सार्वजनिक गणेशोउत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विसर्जन महाघाट, कृत्रीम तलाव, सुरक्षा व्यवस्था, सुरक्षेसाठी सी.सी.टीव्ही कॅमेरे आदी कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे.  

पारसिक रेतीबंदर व कोलशेत येथे विसर्जन महाघाट 

श्री गणेश मुर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेने पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे विसर्जन महाघाट तयार केले आहेत. या ठिकाणी छोटया गणेश मुर्तींबरोबरच 5 फुट आणि त्यापेक्षा मोठया आकाराच्या गणेश मुर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी महापालिकेने आरतीस्थाने आणि निर्माल्य कलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना श्री गणेश विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गणेश भक्तांच्या वाहनांसाठी वाहन तळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. हे विसर्जन महाघाट भरती आणि ओहोटी लक्षात घेऊनच बांधण्यात आले आहेत. 
        
कृत्रीम तलावांची निर्मिती

श्री गणेश मुर्तींच्या विसर्जनामुळे शहरातील तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलावाच्या बाजूला 50 x 30 फुटाचे आणि 10 फुट खोलीचे दोन कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत तर उपवन येथे पालायदेवी मंदिराशेजारी 47 x 16 फुट लांब आणि अडीच मीटर खोलीचा व आंबेघोसाळे तलाव येथे 30 x 60 फुट या आकाराचा, निळकंठ वुडस् टिकुजीनी वाडी, बाळकुम रेवाळे कृत्रीम तलाव व खारेगांव येथेही कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहेत.  या कृत्रीम तलावाच्या ठिकाणी आरतीस्थाने, निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही. 

श्री गणेश मुर्ती स्वीकृती केंद्रे

दरवर्षीप्रमाणे ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रीम तलावांच्या ठिकाणी श्री मुर्तींचे विसर्जन करता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी महापालिकेने मासुंदा तलाव परिसर व मढवी हाऊस, चिरंजीवी हॉस्पीटल, जेल तलाव परिसर, खिडकाळी, उपवन तलाव, खारीगाव, मॉडेला चेकनाका आदी ठिकाणी श्री गणेश मुर्ती स्वीकार केंद्रे उभी करण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणी आरतीस्थाने, निर्माल्य कलश, ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या केंद्रांवर प्राप्त   होणा-या सर्व गणेश मुर्तींचे महापालिकेमार्फत विधिवत विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी विशेष वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.                                                                                      
विशेष स्वयंसेवकांची नियुक्ती                  

नेहमीप्रमाणे दीड दिवसाचा, पाच दिवसाचा आणि दहा दिवसांच्या गणपती विसर्जना दिवशी सुरक्षेची व्यवस्था पाहण्यासाठी पोलीस यंत्रणेबरोबरच महापालिकेचे सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलाचे जवान, एनसीसीचे विद्यार्थी, अनिरूद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेचे 500 प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत.   
                     
सुरक्षा व्यवस्था ; सुरक्षेसाठी सी.सी.टीव्ही कॅमेरे   

श्री गणेशाच्या विसर्जनाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी विसर्जन महाघाट, सर्व कृत्रीम तलावांच्या ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. शहरातील तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी  आणि  शहराचा पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी नागरिकांनी आणि गणेश भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Municipal Corporation ready for eco-friendly Ganeshotsav; Creation of artificial ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.