शिव मंदिर तलावाचे सुशोभीकरण पालिकेने करावे; खा. श्रीकांत शिंदे यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:18 AM2019-06-02T01:18:05+5:302019-06-02T01:18:28+5:30
वडवली येथील शिव मंदिर तलाव नेहमीच दुर्लक्षित होता. या तलावाच्या परिसराची अवस्थाही बिकट होती. तलावातील प्रदूषणाची पातळीही वाढली होती. या तलावातील गाळ काढण्याचा सरकारी खर्च हा चार कोटींच्या घरात होता
बदलापूर : या तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्याने तलावात मध्यभागी महादेवाची मोठी मूर्ती बसवण्यात आली आहे. या तलावाचे लोकार्पण खासदार शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना शिंदे यांनी तलावाच्या कामाची स्तुती केली.
वडवली येथील शिव मंदिर तलाव नेहमीच दुर्लक्षित होता. या तलावाच्या परिसराची अवस्थाही बिकट होती. तलावातील प्रदूषणाची पातळीही वाढली होती. या तलावातील गाळ काढण्याचा सरकारी खर्च हा चार कोटींच्या घरात होता. त्यामुळे अंबरनाथ पालिका तलावातील गाळ काढण्यासाठी पुढे येत नव्हती. अखेर, बदलापूरमधील नगरसेवक तुकाराम म्हात्रे आणि सचिन भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्रित येऊन या तलावातील गाळ काढण्याचे काम लोकसहभागातून करण्याचा निश्चय केला. दोन वर्षांत गाळ काढण्याचे काम पूर्ण केले. १० ते १२ फूट खोल गाळ काढून या तलावाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यात आले.
आज अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांनी सरकारलाही लाजवेल, असे काम केले आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पालिकेवर आली आहे, असे शिंदे म्हणाले. दोन्ही पालिकांनी तलावाच्या सुशोभीकरणासाठी खर्च करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तुकाराम म्हात्रे यांनी आलेल्या अडचणी आणि त्या सोडवण्यासाठी अनेक व्यक्तींनी केलेली मदत याची माहिती दिली.
सुशोभीकरणासाठी स्वतंत्र आराखडा
या तलावाच्या सुशोभीकरणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येईल, असा आशावाद नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जगतसिंह गिरासे, शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हे काम पालिकेने करणे अपेक्षित आहे, ते काम नागरिकांनी एकत्रित येऊन केले आहे. लोकसहभागातून ६० लाख खर्च करून वडवली येथील शिव मंदिर तलावातील गाळ काढला. नागरिकांनी त्यांचे काम केले आहे. आता अंबरनाथ आणि बदलापूर पालिकांनी एकत्रित येऊन शिव मंदिर तलावाचे सुशोभीकरण करावे, अशी सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी येथे केली.