महापालिकेने टेंडर काढून मोफत लस द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:19+5:302021-07-12T04:25:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: गेल्या काही दिवसांपासून महापालिका हद्दीतील कोविड लसीकरण प्रक्रिया बंद पडली आहे. त्याचवेळी खासगी इस्पितळात कोविड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: गेल्या काही दिवसांपासून महापालिका हद्दीतील कोविड लसीकरण प्रक्रिया बंद पडली आहे. त्याचवेळी खासगी इस्पितळात कोविड लस मिळत आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने टेंडर प्रक्रिया पूर्ण करून सामान्यांना मोफत कोविड लस उपलब्ध करावी आणि दिलासा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
रविवारी भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. घनकचऱ्यावरील उपकर आकारणीमुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांना आर्थिक संकटात टाकले असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. डोंबिवली शहरात नागरिकांना भरमसाठ बिले आणि वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याबद्दल दरेकर यांनी नाराजी प्रकट केली. राज्यातील त्रस्त वीज ग्राहकांची त्रासातून सुटका व्हावी यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसात ऊर्जामंत्र्यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले.
शहरातील रस्त्यांची समस्या देखील राज्य शासनाने सोडवावी. युतीत असताना त्यावर तोडगा काढला होता, तो तातडीने पूर्ण करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी दरेकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून केली.
--------
कोविड लस घेतलेल्यांना रेल्वे प्रवास हवाच
ज्या नागरिकांनी कोविडच्या दोन लस घेतल्या आहेत त्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्यावी. प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील कर्जत, कसारा मार्गावरील प्रवाशांना ती मुभा तातडीने देण्यात यावी. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने भेटणार असल्याचे दरेकर म्हणाले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना राज्य सरकारने त्याबाबत प्रस्ताव पाठवावा. केंद्र सरकार तो लागलीच विचारात घेईल, असे दरेकर म्हणाले.
------------
फोटो आहे
........
वाचली