मीरा- भाईंदरमध्ये पालिकेने सुरु केला फिरता दवाखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 06:14 PM2021-10-26T18:14:06+5:302021-10-26T18:14:48+5:30
पालिकेची प्राथमिक उपचार केंद्र असली तरी लांब व आदिवासी पाड्यातील नागरिकांना मात्र पालिका दवाखान्यात येणे लांब व खर्चिक पडत होते.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने रुग्णवाहिकेत फिरता दवाखाना सुरु केला असून त्याचे लोकार्पण महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते मंगळवारी केले गेले . आदिवासी पाडे , नागरी वस्ती पासून तसेच पालिका आरोग्य केंद्रा पासून लांब असलेल्या परिसरातील नागरिकांसाठी हि सुविधा सुरु केल्याचे आयुक्त म्हणाले.
पालिकेची प्राथमिक उपचार केंद्र असली तरी लांब व आदिवासी पाड्यातील नागरिकांना मात्र पालिका दवाखान्यात येणे लांब व खर्चिक पडत होते. त्या अनुषंगाने पालिकेच्या रुग्णवाहिकेचा फिरता दवाखाना बनवण्यात आला असून त्यात डॉक्टर व परिचारीका तैनात असतील.
माता व बालआरोग्य बाह्य रुग्ण तपासणी, गरोदर माता तपासणी, अनाथआश्रम, वृद्धाश्रमातील नागरिकांची तपासणी, उपोषणासाठी बसणाऱ्या व्यक्तींची तपासणी, क्षयरोग कार्यक्रम, कुष्ठरोग कार्यक्रम अंतर्गत नागरिकांची तपासणी इत्यादी मूलभूत सेवा या फिरत्या दवाखान्यात असतील . सोमवार (केशवसृष्टी, पाली चौक, वृध्दाश्रम - उत्तन परिसर), मंगळवार (माशाचापाडा, मांडवीपाडा, मीनाक्षी नगर), बुधवार (रेतीबंदर, चेना, काजूपाडा), गुरुवार (मुंशी कंपाउंड , मिरागाव, मिरा गावठण), शुक्रवार (आयडील पार्क - कन्स्ट्रक्शन साईट, वृध्दाश्रम - मिरागाव परिसर, वृध्दाश्रम - पेणकरपाडा व काशिगाव परिसर), शनिवार (पहिला शनिवार - नाझरेथ पाडा, दुसरा शनिवार - वृध्दाश्रम, तिसरा शनिवार - डोंगरी, चौथा शनिवार - वृध्दाश्रम) या ठिकाणी वेळापत्रक नुसार फिरता दवाखाना उपलब्ध राहणार आहे.