शेकोट्या पेटवताय मग सावधान! महापालिकेने केली ५३ जणांवर कारवाई, २ लाख ९ हजारांचा दंड वसुल
By अजित मांडके | Published: December 9, 2023 05:35 PM2023-12-09T17:35:57+5:302023-12-09T17:36:06+5:30
मुंबई पाठोपाठ ठाण्याची हवा देखील प्रदुषीत झाली आहे. मागील महिनाभरात ठाण्याची हवा कमी जास्त प्रमाणात प्रदुषीत होत असल्याचे दिसत आहे.
ठाणे: मुंबई पाठोपाठ ठाण्याची हवा देखील प्रदुषीत झाली आहे. मागील महिनाभरात ठाण्याची हवा कमी जास्त प्रमाणात प्रदुषीत होत असल्याचे दिसत आहे. परंतु हे प्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. महापालिकेच्या माध्यमातून रोजच्या रोज ५८.८० किमी रस्त्यांची धुलाई केली जात आहे. याशिवाय ८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२३ या कालावधीत विविध आस्थापनांची पाहणी करुन उघड्यावर शेकोट्या पेटवणाºया ५३ जणांकडून २ लाख ९ हजारांचा आणि विकासकांच्या ठिकाणी वाहतुक करणाºया १३८ वाहनांवर कारवाई करुन ५ लाख १३ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तर ३५२ नव्याने उभ्या राहत असलेल्या गृहसंकुलांनाच्या ठिकाणी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली. असे असले तरी मागील महिनाभरात शहराची हवा कधी मध्यम तर कधी प्रदुषित गटात मोडली गेल्याचे दिसून आले. त्यातही सध्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२८ एवढा आढळला आहे.
शहरात आजही विविध ठिकाणी विकास कामे सुरु आहेत. मेट्रोची, महापालिकेच्या माध्यमातून रस्त्याची कामेही सुरु आहेत. त्यातही रोजच्या रोज होणारी वाहतुक कोंडी यामुळे प्रदुषणात वाढच होतांना दिसत आहे. शहरातील वाढते प्रदुषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शहरातील रस्त्यांची धुलाईची कामेही शहरात सुरु आहेत. वाहतुकीची वाढलेली वर्दळ आणि वाहतुक कोंडी यामुळे प्रदुषणात भर पडत आहे. त्यामुळे हे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने महत्वाचे पावले उचलली आहेत. त्यानुसार ७ नोव्हेंबर २०२३ पासून महापालिकेने मार्गदर्शक तत्वे जारी केली आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार विकासकामांच्या ठिकाणी वाहतुक करणाºया वाहनांनी प्रदुषण रोखण्यासाठी उपाय न केल्याने अशा १३८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५ लाख १३ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. शिवाय ३५२ नव्या गृहसंकुलांच्या साईडला नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्या अनुषगांने काही ठिकाणी विकासकांना आता प्रदुषण होणार नाही, या दृष्टीने काही प्रमाणात उपाय योजना केल्याचे चित्र दिसत आहे.
याशिवाय सध्या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे चार महिने थंडीचे मानले जातात. त्यामुळे या कालावधीत थंडी पासून सुटका मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवल्या जातात. परंतु त्यावर देखील पालिकेने कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आतापर्यंत ५३ जणांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून २ लाख ९ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. याशिवाय प्रदुषण रोखण्यासाठी आणि हवा संतुलित ठेवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ३९ ठिकाणी १३ हजार २१० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय २१०० वृक्षांची लागवड ही मियावॉकी पध्दतीने केली आहे. तर ग्रीन कव्हर वाढविण्यासाठी २४ ठिकाणी १७८५ स्केअर मीटर परिसरात लॉन प्लन्टेशन करण्यात आले आहे. तर महापालिकेने प्रदुषण संदर्भात तक्रार करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर २२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याचे निराकरण करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
ठाणे महापालिका हद्दीत घोडबंदर, तीन हाता नाका आणि उपवन येथील हवा मध्यम प्रदुषीत गटात मोडत आहे. त्यातही तीन हातनाका परिसरातील हवा मागील काही दिवसात सुधारली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी येथील हवा अतिप्रदुषीत गटात मोडली गेली होती. परंतु आता तेथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १३५ पर्यंत आला आहे. याठिकाणी करण्यात आलेल्या विविध स्वरुपाच्या उपाय योजनांमुळे येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. परंतु दुसरीकडे उपवन येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक काही प्रमाणात बिघडतांना दिसत आहे. ४ डिसेंबर रोजी येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १८१ एवढा होता. तर ७ डिसेंबर रोजी १४९ एवढी दिसून आला. सध्या ठाण्याचा एकूण निदेर्शांक १२८ इतका आढळून आला आहे. तर ६ डिसेंबर रोजी १३८ असा आढळून आला होता. याचाच अर्थ हवेचा गुणवत्ता निर्देशांक वर खाली होतांना दिसत आहे.
तारीख - हवेचा गुणवत्ता निर्देशांक
- १ डिसेंबर - १४६
- २ डिसेंबर - १३०
- ३ डिसेंबर - १३४
- ४ डिसेंबर - १३८
- ५ डिसेंबर - १२१
- ६ डिसेंबर - १३८
- ७ डिसेंबर - १२८