कोलशेत खाडी किनारी टाकलेला भराव महापालिका काढणार; महापालिका आयुक्त राव यांनी दिले निर्देश

By अजित मांडके | Published: July 9, 2024 03:53 PM2024-07-09T15:53:54+5:302024-07-09T15:54:01+5:30

ठाण्यातील कोलशेत, बाळकुम खाडी किनारी खारफुटी नष्ट करुन त्यावर राडरोड्याचा भराव टाकून त्याठिकाणी अतिक्रमण केले जात असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते.

Municipal Corporation will remove the fill dumped along the Kolshet Bay; Municipal Commissioner Rao gave instructions | कोलशेत खाडी किनारी टाकलेला भराव महापालिका काढणार; महापालिका आयुक्त राव यांनी दिले निर्देश

कोलशेत खाडी किनारी टाकलेला भराव महापालिका काढणार; महापालिका आयुक्त राव यांनी दिले निर्देश

ठाणे : कोलशेत येथील खाडी किनारी कांदळवनाची कत्तल करुन भराव टाकण्यात आल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर त्या संदर्भात विधानसभेच्या अधिवेषनात आवाज उठविण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. आता महापालिकेने देखील या संदर्भात ठोस पावले उचलली असून कोलशेत आणि बाळकुम येथे खाडी किनारी टाकण्यात आलेला भराव काढून टाकण्यात येईल असे आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

ठाण्यातील कोलशेत, बाळकुम खाडी किनारी खारफुटी नष्ट करुन त्यावर राडरोड्याचा भराव टाकून त्याठिकाणी अतिक्रमण केले जात असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने येथील भरावाच्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने चर मारले होते. तर या वृत्ताची दखल घेत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी खाडी किनारी भागातील भरावाची पाहाणी केली होती. तसेच या भरावाचा मुद्दा त्यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. याप्रकरणी चौकशी समिती नेमून कारवाई करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. यानंतर खडबडून जाग आलेल्या जिल्हा प्रशासनाने भरावाप्रकरणी कापुरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानंतर आता सोमवारी महापालिका आयुक्त राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी अधिकाºयांना काही महत्वाच्या सुचना केल्या आहेत. कोलशेत, बाळकूम परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीलगत कांदळवनावर भराव टाकण्यात आला आहे. या भागाची पाहणी केल्यानंतर तेथे मोठी वाहने जाऊ नयेत यासाठी चर खणण्यात आले आहेत. कांदळवनाच्या संवर्धनाबाबत फलक लावण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेनेही मोठी वाहने या भागात प्रवेश करू नयेत याची उंच वाहन अवरोधक बसवले आहेत. आता हा भराव काढून टाकण्याची कारवाई ठाणे महापालिका करणार आहे.

वन विभाग आणि महसूल विभाग यांच्याशीही येथील परिस्थितीबाबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे. कांदळवनावरील हा भराव काढून टाकण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने आक्रमक व्हावे. आपल्या कृतीतून या संवेदनशील विषयाबाबत महापालिकेची आक्रमक भूमिका दिसली पाहिजे. त्यासाठी येत्या तीन दिवसात आतापर्यंत झालेली कारवाई आणि पुढील तीन महिन्यात करायचा कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले.

Web Title: Municipal Corporation will remove the fill dumped along the Kolshet Bay; Municipal Commissioner Rao gave instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.