पालिकेच्या भोंगळ कारभाराने नवी डोंबिवलीच्या नशिबीही समस्यांचे भोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 06:51 AM2018-05-28T06:51:34+5:302018-05-28T06:51:34+5:30

फार वर्षापूर्वी डोंबिवली हे गाव होते. टुमदार घरे, स्वच्छ हवा होती. एखाद्या रूग्णास हवापालटासाठी डॉक्टर डोंबिवलीला राहयला जाण्याचा सल्ला देत असे. पण कालांतराने औद्योगिकीकरण झाल्याने कारखान्यांची संख्या वाढली.

Municipal corporation's burden of problems of new Dombivli | पालिकेच्या भोंगळ कारभाराने नवी डोंबिवलीच्या नशिबीही समस्यांचे भोग

पालिकेच्या भोंगळ कारभाराने नवी डोंबिवलीच्या नशिबीही समस्यांचे भोग

Next

- मुरलीधर भवार, डोंबिवली
फार वर्षापूर्वी डोंबिवली हे गाव होते. टुमदार घरे, स्वच्छ हवा होती. एखाद्या रूग्णास हवापालटासाठी डॉक्टर डोंबिवलीला राहयला जाण्याचा सल्ला देत असे. पण कालांतराने औद्योगिकीकरण झाल्याने कारखान्यांची संख्या वाढली. रोजगारासाठी मोठ्या संख्येने कामगार येऊ लागले. मुंबईत घर घेणे परवडत नसल्याने सामान्यांना परवडतील अशी घरे डोंबिवलीत बांधली जात असल्याने प्रत्येकाचा कल या शहराकडे वाढू लागला. अशातूनच बेकायदा इमारतीही उभ्या राहू लागल्या. नगरपालिकेच्या काळात कुणाचेच नियंत्रण नसल्याने जवळजवळ इमारती बांधण्यात आल्या. अग्निशमन दलाचा बंब, रूग्णवाहिकाही जाऊ शकणार नाही इतके रस्ते अरूंद होते.
नगरपालिकेची महापालिका झाली. तेव्हा शहराचा चेहरामोहरा बदलेले अशी येथील नागरिकांना आशा होती. कारण येथे राहणारे हे सुशिक्षित, सुसंस्कृत होते. मात्र त्यांची निराशाच झाली. महापालिका होऊनही समस्या सुटल्या नाहीत. कदाचित त्यात वाढच झाली. आजही कल्याण-डोंबिवलीत समस्या सुटलेल्या नाहीत. मग ते जुनी डोंबिवली असो की नवे डोंबिवली. जुन्या डोंबिवलीमध्ये विकासाला मर्यादा पडल्यावर विकासकांचा मोर्चा शहरापासून जवळ असलेल्या मानपाडा, भोपर, सागाव, सागर्लीसारख्या ग्रामीण भागाकडे वळवला. ही गावे महापालिकेत नव्हती तेव्हा त्याठिकाणी चार ते आठ मजल्याच्या इमारती उभ्या राहिल्या. २०१५ पासून ही २७ गावे महापालिका हद्दीत आली. मात्र त्याठिकाणी खराब व अरुंद रस्ते, पाणीटंचाई, अस्वच्छता आणि बेकायदा बांधकामांचा प्रश्न तसाच आहे. महापालिका या परिसरात केवळ नावालाच आहे. जरी हा भाग नव्या डोंबिवलीत मोडत असला तरी विकासाच्या नावाने बोंबच म्हणावी लागेल.
भोपर, नांदिवली पंचानंद, सागाव, सागर्ली, मानपाडा या गावांमध्ये ज्यावेळेस ग्रामपंचायतीचा कारभार होता तेव्हाही ही गावे विकासापासून कोसो दूर होती. पालिकेत आल्यावर विकासाची गंगा येईल असे वाटले होते. पण अद्याप तरी शक्य झालेले दिसत नाही. मूळात ही गावे पालिकेत घेऊ नका अशी ग्रामस्थांची मागणी आहे. पण सरकारने विकासाचे गाजर दाखवत ही गावे पालिकेत घेतली. पण आज या गावांची परिस्थितीत ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे.
डोंबिवली शहराला लागूनच ही गावे आहेत. यापूर्वी ही गावे महापालिका हद्दीबाहेर होती. त्यामुळे शहरी भागाला जोडून असूनही त्यांना शहरीकरणाची ओळख नव्हती. अडीच वर्षापासून ही गावे महापालिकेशी जोडल्याने ती विकास आराखड्यानुसार व भौगोलिकदृष्ट्या शहराचा भाग झालेली आहेत. अनेकांनी येथील बेकायदा चाळ, इमारतीत घरे घेतली आहेत. मात्र ही घरे घेताना येथे रस्ते, स्वच्छता, शिक्षण, वाहतुकीची आणि पाण्याची सुविधा आहे की नाही याचा काही विचार केलेला नाही.
डोंबिवलीतील मानपाडा रस्त्याचे पालिका क्षेत्रातील भागाचे काँक्रिटीकरण केले आहे. आता मानपाडा गाव महापालिकेत समाविष्ट झाले तरी या रस्त्याचा पुढील भाग काँक्रिटचा करण्यात आलेला नाही. रामचंद्रनगरच्या नाल्यापासून पुढे सागाव, सागर्ली, भोपर ते मानपाडा सर्कलपर्यंत डांबरी रस्ता आहे. हा रस्ता अतिशय खराब आहे.
सागर्ली, सागाव येथे तो अरुंद आहे. रस्त्याच्या दुतर्फा इमारती आणि चाळी बांधलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात रस्त्याचे रुंदीकरण करायचे झाल्यास इमारती व चाळींवर प्रथम हातोडा टाकावा लागेल. या रस्त्यावर एक लग्नाचा हॉल लक्षवेधी ठरत आहे. तसेच डीमार्टमुळे येथे ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे.

बेकायदा बांधकामांना प्रोत्साहन
अधिकृत बांधकामधारकांनाही लवकर परवानगी दिली जात नाही. त्यामुळे बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. एखाद्या टाऊनशीपला लगेच परवानगी दिली जाते. मात्र भूमिपूत्रांना साधे घर बांधण्याची मुभा नाही. परवानगीच दिली जात नसल्याने बेकायदा बांधकामे उभी राहिल्याने या बांधकामांची क्षमता दहा वर्षांनी संपुष्टात येऊन या इमारती पडण्याचा धोका आहे. त्यामुळे पालिकेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

२७ गावांच्या आराखड्याला दिरंगाई
पालिका हद्दीत भोपर, मानपाडा, सागर्ली, सागाव, नांदिवली समाविष्ट झाल्यावर बांधकामांसाठी एक एफएसआय दिला जाणे अपेक्षित होते. तो कमी करुन केवळ ०.९५ इतकाच दिला जात आहे. टीडीआर देण्याचे नियमही ठरवलेले नाहीत. सरकारने या भागासाठी १९८३ पासून आतापर्यंत तब्बल ३१ वर्षे न्यायप्रधिकरणच नेमले नव्हते. २७ गावांचा विकास आराखडा तयार करण्यात आघाडी सरकारने दिरंगाई केली. परिणामी गावांचा विकास रखडला आहे.

प्रशासनावर वचकच नाही

भोंगळ कारभारामुळे कल्याण, डोंबिवली शहरे समस्यांच्या गर्तैत सापडली आहेत. लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक राहिलेला नसल्याने अधिकाऱ्यांचे फावते आहे. या परिस्थितीत सध्याच्या डोंबिवलीची जी गत झाली आहे तसेच भोग सागाव, सागर्ली, नांदिवली, भोपर भागात नव्याने वसणाºया डोंबिवलीतील रहिवाशांच्या वाट्याला आले आहेत. त्यांचीही सुविधांसाठी परवड होत असल्याचे तेथील पाहणीदरम्यान उघड झाले.

Web Title: Municipal corporation's burden of problems of new Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.