महापालिकेची धडक कारवाई, उल्हासनगरातील साडी सेंटर दुकान सील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 04:02 PM2021-04-14T16:02:58+5:302021-04-14T16:04:33+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरात प्रसिद्ध गजानन व जपानी मार्केट असून दोन्ही मार्केट कपड्यासाठी प्रसिद्ध आहेत. लॉकडाऊन काळात दुकाने बंद असल्याने, लग्न व सणासाठी कपडे खरेदी कसे करावे?. असा प्रश्न नागरिकांना पडला,
सदानंद नाईक
उल्हासनगर - कॅम्प नं-२ गजानन मार्केट परिसरातील शगुन साडी सेंटर दुकान सताड उघडे ठेवून कपड्याची विक्री करीत असल्याची माहिती सहायक आयुक्त अजय खतूराणी यांना मिळाली. सदर घटना मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता घडली असून खतुरानी यांच्या पथकाने दुकान सील केले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरात प्रसिद्ध गजानन व जपानी मार्केट असून दोन्ही मार्केट कपड्यासाठी प्रसिद्ध आहेत. लॉकडाऊन काळात दुकाने बंद असल्याने, लग्न व सणासाठी कपडे खरेदी कसे करावे?. असा प्रश्न नागरिकांना पडला. नागरिकांच्या गरजेचा फायदा काही दुकानदारांनी उचलला असून कोरोना नियमाचे उल्लंघन करून कपड्यासह अन्य दुकाने मागच्या दारांनी सुरू असल्याची चर्चा शहरात आहे. गजानन मार्केट परिसरातील शगुन साडी सेंटर दुकान सुरू असून कपड्याची विक्री सुरू असल्याची माहिती प्रभाग समिती क्रं-२ चे सहायक आयुक्त अजय खतुरानी यांच्या पथकाला मिळाली. मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान दुकानात धाड टाकली असता दुकानात कपड्याची विक्री होत असल्याचे चित्र होते. सहायक आयुक्त खतुरानी यांच्या पथकाने दुकानातील ग्राहकांना काढून दुकान सील केले.
शासनाच्या नियमानुसार दुकानावर कारवाई करण्याचे संकेत सहायक आयुक्त अजय खतूराणी यांनी दिले. तसेच पहाटे, सकाळी व सायंकाळी शासनाच्या कोरोना नियमाचे उल्लंघन करून दुकाने सताड उघडी ठेवणाऱ्या दंडात्मक कारवाईसह दुकाने सील करण्याचे संकेत खतुरानी यांनी दिले. कपड्यासह जीन्स, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल दुकाने मागच्या दाराने सुरू असल्याची चर्चा शहरात आहे. महापालिकेने प्रभाग निहाय भरारी पथके स्थापन करून कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.