मांडा महापालिकेत की ग्रा.पं.त?
By admin | Published: June 8, 2015 11:20 PM2015-06-08T23:20:44+5:302015-06-08T23:20:44+5:30
अपुऱ्या रस्त्यांमुळे वाहातूक कोंडीचा प्रश्न, गटारे भरून वाहत आहेत, कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न अशा प्रकारच्या विविध समस्यानी ग्रासलेला प्रभाग क्रमांक ५ मांडा समस्यांचे माहेरघर बनलेला आहे.
उमेश जाधव, टिटवाळा
अपुऱ्या रस्त्यांमुळे वाहातूक कोंडीचा प्रश्न, गटारे भरून वाहत आहेत, कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न अशा प्रकारच्या विविध समस्यानी ग्रासलेला प्रभाग क्रमांक ५ मांडा समस्यांचे माहेरघर बनलेला आहे. प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळेच या प्रभागाची ही अवस्था अशी असल्याचे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची स्थापनेपासून मांडा (कोळीवाडा) हे गांव पालिकेच्या अ प्रभागाचे प्र.क्र ५ म्हणून घोषीत करण्यात आले. या प्रभागाचा गेली २५ वर्षात पाहिजे तसा विकास झाला नाही. येथून लगतच्या वासुंद्री, सांगोडा, कोंढेरी इतर गांवातील नागरीकांना प्रवास करतांना वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामपंचायत काळातील गावातील तुटलेली व घाणीने भरलेली गटारे यामुळे आरोग्याच्या प्रश्नाने रहिवासी हैराण होत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन याच गटारातून गेल्याने लिकेज होऊन गटाराच्या दूषित पाण्याचा पुरवठा होण्याच्या घटना सतत घडत आहेत. गटारांच्या कामासाठी महिन्याभरापासून तेजस्विनी पॅलेस समोर खोदकाम करून ठेवले आहे.
उमा दर्शन सोसायटीसमोर देखील तीच अवस्था. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आता पावसाळा तोंडावर आल्याने याचा मोठ्या प्रमाणात नागरीकांना त्रास होणार आहे. जागोजागी पसरलेल्या कचऱ्याचे ढिगारे उचलण्यास पालिका प्रशासन असमर्थ असल्याची ओरड नागरीक करत आहेत. ग्रामपंचायत कार्यालयातच सध्या पालिकेचे कामकाज चालते. तेच टेबल, त्याच खुर्च्या आणि तीच कपाटे. आजतागायत या कार्यालयाचा कायापालट करण्याता प्रयत्न ना स्थानिक नगरसेवक, पालिका प्रशासनाने केला नाही. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळेच प्रभागाचा विकास खुंटल्याची ओरड नागरिक करत आहेत. पालिका प्रशासन फक्त नागरिकांकडून कर वसुलीचे काम मात्र इमानदारीने करत आहे.
रस्त्याच्या कामाचेही तेच. नगरसेवक बुधाराम सरनोबत यांनी वारंवार प्रशासनाकडे ठेकेदाराच्या मनमानी कामासंदर्भात फक्त तक्रारी केल्या आहेत. प्रशासन या ठेकेदारास पाठिशी घालत असल्याचा कांगावा देखील सरनोबत करत आहेत.
या प्रभागाचा विकास होण्याकरिता अद्याप १५ वर्षाचा कालावधी देखील कमी पडेल असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या उदानिसनतेमुळेच प्रभागाचा विकास खुंटला आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील सर्वात जास्त प्रशासनाता निधी आणनारा मि नगरसेवक आहे. जवळ जवळ मांडा च्या विकासा करिता मि कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे. परंतू पालिका प्रशासन फाईल मंजूर करेणे, टेंडरींग करणे व निधी देण्यास विलंब लावत आसल्यामुळेच विकास कामांना विलंब होत आहे.
- बुधाराम सरनोबत
नगरसेवक