झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरुद्ध महापालिकेचे ऑपरेशन रुद्र 

By धीरज परब | Published: July 12, 2023 06:53 PM2023-07-12T18:53:12+5:302023-07-12T18:53:40+5:30

झोपडपट्टी परिसर स्वच्छ ठेवण्यासह अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. 

Municipal Corporation's Operation Rudra against those who spread filth in the slum area | झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरुद्ध महापालिकेचे ऑपरेशन रुद्र 

झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरुद्ध महापालिकेचे ऑपरेशन रुद्र 

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर मधील अनेक झोपडपट्टी भागात बेजबाबदार लोक नाले व खाड्यात तसेच उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असल्याने त्यांच्याविरुद्ध महापालिकेने ऑपरेशन रुद्र ही मोहीम सुरु करणार आहे. झोपडपट्टी परिसर स्वच्छ ठेवण्यासह अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. 

शहरातील अनेक झोपडपट्टी भागात राहणारे लोक हे दैनंदिन कचरा हा महापालिकेच्या कचरा गाडीत न टाकता लगतच्या नाले व खाडी पात्रात राजरोसपणे टाकत असतात. त्यात प्लास्टिक पिशव्यांचा मोठा समावेश असतो. त्यामुळे नाले - खाड्या ह्या कचऱ्याने तुंबलेल्या असतात. पालिका वर्षाक्तउन पावसाळ्या आधी नालेसफाई करते तेव्हा कचरा काढला जातो. पण लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा लोक कचरा टाकून पाण्याचा निचरा बंद करतात. त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंड्या तयार केल्या जातात. यामुळे दुर्गंधी पसरून रोगराईचा धोका असतो. 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत झोपडपट्टी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यासह कचरा टाकणारे व प्लास्टिक पिशव्या वापरणांऱ्यावर कारवाई तसेच जनजागृतीचे निर्देश आयुक्त दिलीप ढोले यांनी उपायुक्त रवी पवार यांना दिले होते. परंतु प्रशासना मार्फत त्यावर ठोस अमलबजावणी केली जात नसल्याने यंदा नाले सफाई नंतर गणेश देवल नगर, बजरंग नगर आदी भागातील नैसर्गिक प्रवाह पुन्हा कचऱ्याने तुंबल्याचे लोकमत ने उघडकीस आणले होते. 

आयुक्त ढोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचे समजते. आता आयुक्तांच्या आदेशानुसार झोपडपट्टी परिसरात ऑपरेशन रुद्र ही विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात गणेश देवल नगर व जय अंबे नगर मधील नागरिकांनी स्वच्छता ठेवावी यासाठी मोहीम राबवली जाईल.

प्रत्येक गल्लीत ओला व सुका कचरा टाकण्यासाठी डबा दिला जाईल. पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांनी कचरा कुठे टाकावा व  कुठे टाकू नये, वर्गीकरण कसे करावे याची जनजागृती केली जाईल. बंदी असताना देखील अनेक जण प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असल्याने वापरणारे व विकणारे यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. सहाय्यक स्वच्छता निरीक्षकाची नियुक्ती केली असून नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास आठवडाभरानंतर दंडात्मक कारवाई केली जाईल. दोन महिने मोहीम चालणार शहरातील इतर झोपडपट्टी परिसरात ऑपरेशन रुद्र राबवण्यात येईल असे उपायुक्त रवी पवार यांनी सांगितले.
 

Web Title: Municipal Corporation's Operation Rudra against those who spread filth in the slum area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.