हॉटेल सील करण्यास महापालिकेची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:42 AM2021-08-26T04:42:45+5:302021-08-26T04:42:45+5:30
मीरा रोड : कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन हॉटेलना सील करा, असे लेखी पत्र पोलीस उपायुक्तांनी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तांना ...
मीरा रोड : कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन हॉटेलना सील करा, असे लेखी पत्र पोलीस उपायुक्तांनी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तांना दिले होते. महिना व्हायला आला तरी पालिकेने पोलिसांच्या पत्राला केराची टोपली दाखवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बड्या व्यावसायिकांना पाठीशी घातल्याने टीका होत आहे.
उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘हॉटेल मिड टाऊन’ आणि ‘हॉटेल कर्मा द ईटलरी लॉन’ यांनी कोरोना नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी अनेक गुन्हे या हॉटेलचालकांवर दाखल केले आहेत. काेरोना नियमांचेच उल्लंघन नव्हे, तर हुक्का पार्लर चालविणे, आदी गैरप्रकारही चालविले होते. स्थानिक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांच्या अहवालानंतर पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी २९ जुलै रोजीच्या लेखी पत्रानुसार महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे ही दोन हॉटेल सील करण्याची कारवाई करण्यास कळविले होते; पण ऑगस्ट संपायला आला तरी महापालिकेने मात्र पोलीस उपायुक्तांच्या पत्रास काडीची किंमत न देता हॉटेल सील करण्याची कारवाई केली नाही. कोरोना नियमांचे सामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर लगेच कारवाई केली जाते; पण राजकारणी आणि हॉटेल, आदी मोठ्या व्यावसायिकांवर मात्र महापालिका कारवाईऐवजी संरक्षण देण्याचे काम करत असल्याची टीका होत आहे. याप्रकरणी स्थानिक प्रभाग अधिकारी हंसराज मेश्राम यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.