नगरसेवक अन् प्रभाग सुधारणा निधी झाला दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 03:29 AM2018-09-09T03:29:43+5:302018-09-09T03:30:57+5:30
मागील वर्षीप्रमाणेच यंदादेखील ठाणे महापालिकेच्या मूळ अंदाजपत्रकात नगरसेवक निधी आणि प्रभाग सुधारणा निधीला सपशेल कात्री लावली होती.
- अजित मांडके
ठाणे : मागील वर्षीप्रमाणेच यंदादेखील ठाणे महापालिकेच्या मूळ अंदाजपत्रकात नगरसेवक निधी आणि प्रभाग सुधारणा निधीला सपशेल कात्री लावली होती. परंतु, नगरसेवकांना मागील वर्षीप्रमाणे यंदाही नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधी दुप्पट करून घेतला आहे. मागील वर्षी ५५ लाखांचा निधी मिळाला होता. यंदा तो ८० लाखांवर गेला आहे. तर, चार महिने रखडलेले अंदाजपत्रकसुद्धा आता मार्गी लागले असून यावर महापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. तर, आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात ३४४.१३ कोटींची वाढ केल्याने ते आता ४०३९.२६ कोटींच्या घरात गेले आहे. महापालिकेचे २०१७-१८ चे ३०४७.१९ कोटींचे सुधारित आणि २०१८-१९ चे ३६९५.१३ कोटींचे मूूळ अंदाजपत्रक आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मार्चमध्ये महासभेला सादर केले होते. परंतु, नगरसेवक निधी आणि प्रभाग सुधारणा निधी शून्य ठेवला होता. दरम्यान, अर्थसंकल्पीय विशेष महासभेच्या चर्चेच्या वेळेस प्रभाग सुधारणा आणि नगरसेवक निधी हा प्रत्येक लोकप्रतिनिधीला एक कोटीचा देण्याचे प्रस्तावित केले होते. परंतु, मागील वर्षीही अशाच प्रकारे मागणी केली होती. त्यानंतर, प्रशासनाने नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधी मिळून ५० ते ५५ लाखांपर्यंत नेला होता. आता यात दुप्पट वाढ करण्याची मागणी नगरसेवकांनी केल्याने उत्पन्न आणि खर्चाशी त्याचा ताळमेळ बसवून त्यानुसार तरतूद केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. याच मुद्यावरून अंदाजपत्रक मंजुरीस विलंबसुद्धा होत होता.
>काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनीही १५ दिवसांत अंदाजपत्रक मंजूर न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर, तातडीने हालचाल होऊन अंदाजपत्रकावर एकमत झाले. ३४४.१३ कोटींची वाढ सुचवून ते मंजूर केले आहे. त्यामुळे आता २०१८-१९ चे अंदाजपत्रक हे आता ४०३९.२६ कोटी रुपयांवर गेले आहे.नगरसेवक निधी ३० लाख आणि प्रभाग सुधारणा निधी ५० लाख असे मिळून प्रत्येक नगरसेवकाला ८० लाखांचा निधी मिळणार आहे. यासाठी महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी जोर लावल्याने आणि इतर ज्येष्ठ लोकप्रतिनिधींनी केलेल्या मध्यस्थीमुळे अखेर नगरसेवकांची चांदी झाली आहे.